मुंबई - नागपूर ते मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या २१० किलोमीटर कामाचा शुभारंभ २ मेला होणार होता. मात्र महामार्गावरील अनेक ठिकाणची कामे प्रलंबित आहेत. तर काही कामे धिम्यागतीने सुरू आहेत. त्यामुळे टोल आकारण्यासाठी टोलनाक्यांची कामे पूर्ण करणाऱ्या एमएसआरडीसी प्रशासनाला प्रवाशांच्या सुरक्षेचा विसर पडला आहे का.? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे. कामे प्रलंबित असल्याने समृद्धी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
पुलाचे बांधकाम अद्याप सुरू, विद्युत दिवेही नाहीत -राज्याच्या आर्थिक राजधानीला उपराजधानीने जोडण्यासाठी मुंबई ते नागपूर हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. मार्गावरील शेलू ते नागपूरमधील शिवमडका हे २१० किलोमीटरचा भाग लवकरच सर्वांसाठी खुला होणार आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकार आणि एमएसआरडीसीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या महामार्गावरील अनेक कामे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागपूरकडील टोल नाक्यापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पुलाच्या बांधणीचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूला खोदकाम केले जात आहे. तर २१० किलोमीटर मार्गावरील काही भागात रस्त्यावर रेलिंग, विद्युत दिवे बसवलेले नाहीत. काही भागात हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गावर १२० च्या गतीने वाहने धावणार आहेत. त्यामुळे महामार्गाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यापूर्वी टोल नाके बांधणारे एमएसआरडीसी प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचे बोलले जात आहे.