मुंबई - मुंबईकर-नागपूरकरांचा प्रवास सुपरफास्ट करण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. हा सुमारे 701 किमीचा महामार्ग 1 मे 2022 मध्ये सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्याने मुंबई ते नागपूर हा प्रवास केवळ 8 तासांत पूर्ण करणे नागरिकांना शक्य होणार आहे.
मुंबई ते नागपूर हे अंतर पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना बराच वेळ लागतो. त्यामुळेच राज्याची राजधानी आणि राज्याची उपराजधानी एकमेकांना थेट जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. सुरुवातीला या प्रकल्पाला जोरदार विरोध झाला. पण तरीही एमएसआरडीसीने हा प्रकल्प रेटून नेला. जमीन संपादन असो वा बांधकाम सर्वच काम वेगात सुरू आहे. त्यामुळेच येत्या आठ महिन्यात म्हणजेच 1 मे रोजी 2021 ला या मार्गातील 520 किमीचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा महामार्ग सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचे मोपलवार यांनी सांगितले आहे. तर 623 किमीचा नागपूर ते इगतपुरी हा टप्पा डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होईल, अशी त्यांनी माहिती दिली.
खुशखबर! मे 2022 पासून मुंबई ते नागपूरचा प्रवास केवळ 8 तासांत पूर्ण करणे शक्य - Nagpur to Mumbai journey distance news
येत्या आठ महिन्यात म्हणजेच 1 मे रोजी 2021 ला या मार्गातील 520 किमीचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. मजूर आणि इतर कर्मचारी मिळून 20 हजार जण या प्रकल्पावर काम करत आहेत. त्यामुळे 1 मे 2022 पर्यंत काम पूर्ण करणे शक्य होईल, असा विश्वास राधेश्याम मोपलवार यांनी व्यक्त केला.
कोरोना-टाळेबंदीचा प्रकल्पाच्या कामाला फटका
समृद्धी महामार्गाचे काम वेगात सुरू होते. मोठ्या संख्येने मजूर आणि इतर कर्मचारी वर्ग काम वेगात पुढे नेत होते. मात्र मार्चमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव सुरू झाला. त्यानंतर टाळेबंदी घोषित केल्याने मुंबई, ठाणे आणि अन्य जिल्ह्यातील कामावर परिणाम झाला. मोठ्या संख्येने स्थलांतरीत मजूर काम सोडून गावी गेले. याचाही महामार्गाच्या कामाला मोठा फटका बसला. सध्या, हळूहळू परिस्थिती सुधारत असून कामाला पुन्हा वेग येत आहे. मजूर आणि इतर कर्मचारी मिळून 20 हजार जण या प्रकल्पावर काम करत आहेत. त्यामुळे 1 मे 2022 पर्यंत काम पूर्ण करणे शक्य होईल, असा विश्वास राधेश्याम मोपलवार यांनी व्यक्त केला. जर कोरोना-टाळेबंदी नसती तर नक्कीच हा प्रकल्प किमान सहा महिने आधी सेवेत दाखल झाला असता, असेही मोपलवार यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकल्पासाठी 55 हजार कोटी खर्च-
एकाचवेळी 701 किमी लांबीचा बांधण्यात येणारा रस्ता हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा एमएसआरडीसीने केला आहे. तर 8 मार्गिकेच्या या मार्गासाठी तब्बल 55 हजार 332 कोटी इतका खर्च येणार आहे. यातील काही निधी कर्जाच्या माध्यमातून तर काही निधी राज्य सरकार-एमएसआरडीसी उभारणार आहे.
असा आहे समृद्धी महामार्ग
- मुंबई ते नागुपर 701 किमीचा महामार्ग
- एकूण खर्च 55 हजार 332 कोटी
- 8 मार्गिका
- 10 जिल्ह्यातून, 26 तहसील परिसरातून तर 390 गावातून महामार्ग जाणार
- एकूण 20 हजार 820 हेक्टर जमीन संपादन
- महामार्गासाठी 8 हजार 520 हेक्टर जागेचा वापर
- 10 हजार 180 हेक्टर जागेवर टाऊनशिप
- 2017 पासून प्रकल्प सुरू
- प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर 2018 मध्ये सुरुवात
- जुलै 2020 पर्यंत 40 टक्के काम पूर्ण
- पहिला 520 चा नागपूर ते शिर्डी टप्पा 1 मे 2021 ला होणार पूर्ण
- 623 किमीचा नागपूर ते इगतपुरी टप्पा डिसेंबर 2021 पर्यंत होणार पूर्ण
- मुंबई ते नागपूर 701 किमीचा संपूर्ण महामार्ग 1 मे 2022 ला पूर्ण होणार
- मुंबई ते नागपूर701 किमीचे अंतर 8 तासांत पूर्ण होणार