मुंबई :शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुंबई महानगर पालिकेतील शिवसेनेची गेली २५ वर्षे सत्ता आहे. शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाकडून एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतअसलेल्या आमदारांचा वापर करून घेतला जाणार आहे.
पालिकेवर शिवसेनेची सत्ता :देशाची आर्थिक राजधानी व जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. या मुंबईमधील नागरिकांना मुंबई महानगर पालिकेकडून सोयीसुविधा पुरवल्या जातात. मुंबई महानगरपालिकेचा ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. अशा महापालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. या कालावधीत काही गेली ५ वर्षे सोडल्यास भाजपा शिवसेनेचा मित्र पक्ष आहे. पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक आहेत. त्यावेळेची शिवसेनेने महापौर पद मिळवले. मात्र आपले महापौर पद शाबूत राहावे म्हणून शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक फोडावे लागले. अपक्ष आणि मनसेच्या नगरसेवकांना शिवसेनेने प्रवेश देऊन आपल्या नगरसेवकांची संख्या ९७ पर्यंत नेली.
शिंदे गटाचा असा केला जाणार वापर :२०१७ च्या निवडणुकीतील निकाल पाहता भाजपाला शिवसेनेपेक्षा दोनच जागा कमी मिळाल्या होत्या. पालिकेत एकूण २३६ जागा असून त्यापैकी ५० टक्के जागा म्हणजेच ११८ जागा निवडून आणण्याची तयारी भाजपकडून सुरु आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असलेले मुंबईमधील आमदार प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर यांचा वापर केला जाणार आहे. या आमदारांच्या सोबत असलेल्या २० ते २२ नगरसेकांना भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाकडून लढवून ११८ हुन अधिक नगरसेवक जिंकून आणून भाजपचा महापौर मुंबई महापालिकेवर बसवण्याची रणनीती बनवण्यात आली आहे.
भाजपचे 'मिशन १३४' :मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी पालिकेने 'मिशन १३४' सुरु केले आहे. मुंबई महानगरपालिकेला यंदा १३४ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे १३४ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे अशी माहिती आमदार व माजी मंत्री आशिष शेलार यांनी दिली. मुंबईकर जनतेने ११८ पेक्षा जास्त जागा जिंकून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेत मुंबईकरांचा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल असा विश्वास भाजपा आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. भाजपाने आधीच 'मिशन १३४' सुरु केले आहे. त्यानुसार भाजपचे काम सुरु आहे अशी माहिती भाजपचे पालिकेतील प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली.