महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 3, 2021, 9:55 PM IST

ETV Bharat / city

आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील नाईट लाईफ व पर्यटनासाठी मुंबई महापालिकेचे नियोजन

मुंबईच्या ६५ रस्त्यांवर खाद्य संस्कृती केंद्र उभारले जाणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. यावरून पर्यटन मंत्री यांच्या संकल्पनेतील नाईट लाईफ आणि पर्यटन यासाठीचे नियोजन करण्यात आल्याचे दिसत आहे.

night life and tourism in budget
night life and tourism in budget

मुंबई - मुंबईमधील नद्यांसह पदपथ, वाहतूक बेटे, पूलाखालील जागा, उद्यानांचे रुपडे पालटले जाणार आहे. त्याचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईचे सौंदर्य खुलणार आहे, असे आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईच्या ६५ रस्त्यांवर खाद्य संस्कृती केंद्र उभारले जाणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. यावरून पर्यटन मंत्री यांच्या संकल्पनेतील नाईट लाईफ आणि पर्यटन यासाठीचे नियोजन करण्यात आल्याचे दिसत आहे.

मुंबईतील नाईट लाईफ -

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीत हेरिटेज वॉक पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून सुरु झाला आहे. याच धर्तीवर मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प पालिका आयुक्तांनी नव्या अर्थसंकल्पात केला आहे. पादचाऱ्यांना सुस्थितीत चालता यावे, मुंबईतील १४९ पदपथांच्या सौंदर्यीकरण केले जाणार आहे. १२८ वाहतूक बेटांवर प्रकाश झोतासाठी एल.ई.डी दिवे, विविध प्रकारची शोभिवंत झाडे, आकर्षक देखावे, रंगरंगोटी, विभाजकांचे सौदर्य खुलवले जाणार आहे. ३४४ उड्डाण पुलाखालील जागांपैकी ४२ जागा सुशोभित केल्या आहेत. उर्वरित पुलांच्या खांबावर व्हर्टीकल गार्डन, छोटेखाणी हॉकी स्टेडीयम उभारुन सौंदर्य खुलावले जाईल. याच बरोबर २४ प्रभागातील १२० उद्याने व मोकळ्या जागांचा विकास आणि देखभाल करण्यासाठी धोरण आखले आहे. प्रत्येक उद्यानातील पाच उद्यानांचा यात समावेश असणार आहे. मुंबईच्या ६५ रस्त्यांवर खाद्य संस्कृती केंद्र उभारले जाणार आहेत. प्रत्येक ठिकाणी ३० हून अधिक अशा एकूण ३३३१ लोकप्रिय खाद्य विक्रेते, दुकानदार, स्टॉल्स धारकांचा समावेश केला जाईल. पदपथ, भिंतीची रंगरंगोटी, उड्डाणपूलाखालील मोकळ्या जागा, वाहतूक बेट, रस्त्यांवरील खाद्य स्टॉल्स करिता २०० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे.

शौचालयांची पुनर्बांधणीवर भर -


वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत एकूण २२७७४ इतकी शौचकूपे प्रस्तावित आहेत. पैकी ८६३७ नवीन शौचकूपे तर १४१३७ जुन्या शौचकूपांचे पुनर्बांधणी केली जाणार आहे. ३१ डिसेंबर २०२१ अखेरीस २०३०१ शौचकूपे बांधली जातील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सॅनिटरी पॅड्स, वॉश बेसीन, सुका आणि ओल्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरा कुंड्या ठेवल्या जाणार आहेत. अर्थसंकल्पात ३२३ कोटींची तरतूद केली आहे.

कोस्टल रोडला वेग -


मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासोबत, गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासाठी १,३०० कोटी रुपयांची तरतूद आहे. मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी गतवर्षीच्या अर्थसंकल्पात १५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. यात आणखी ५०० कोटी रुपयांची भर पडली आहे.

या प्रकल्पांवर १८ हजार ७५० कोटींचा खर्च -


कोस्टल रोड, एसटीपी प्रकल्प, हायड्रो सोलर पॉवर, वैतरणा धरण, रेल्वेवरील १२ पूल, ६ इतर पूल, ५ रुग्णालयाचे नूतनीकरण यासाठी पालिका १८ हजार ७५० कोटी रुपये खर्च करणार आहे.

या विभाग कार्यालयाचे विभाजन -


मुंबई महापालिकेच्या पी नॉर्थ विभागात मालाड पश्चिम हा विभाग येतो. हा विभाग मोठा असल्याने त्याचे विभाजन करून पी इस्ट आणि पी वेस्ट असे दोन विभाग करण्यात आले आहेत. यामुळे आता पालिकेचे २४ ऐवजी २५ विभाग कार्यालय असणार आहेत. पी नॉर्थच्या विभाग कार्यालयाचे विभाजन झाल्यामुळे नागरिकांना सोयी सुविधा देणे सोपे जाणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. पी नॉर्थ प्रमाणेच येत्या काळात कुर्ला येथील एल वॉर्ड आणि सांताक्रूझ एच ईस्ट वॉर्डचेही विभाजन केले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details