मुंबई- जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या, देशातील श्रीमंत अशा मुंबई शहराच्या महापालिकेचा सन २०२१-२२ चा ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिका आयुक्त इकबाल सिंग यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला.
पालिकेचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प सन २०२०-२१ पेक्षा ५ हजार ५९७.८१ कोटींनी वाढला आहे. सन २०२०-२१ मध्ये ३३ हजार ४४१.०२ कोटींचा, सन २०१९-२० चा अर्थसंकल्प ३० हजार ६९२ कोटींचा होता. तर २०१८-१९ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २७ हजार २५८ कोटी रुपये इतका सादर करण्यात आला होता.
महसुली उत्पन्न २७ हजार ८११.५७ कोटी एवढे प्रस्तावित
महसुली उत्पन्नात सन २०२० - २१ आर्थिक वर्षात २८ हजार ४४८.३० कोटी वरून २२ हजार ५७२१३ कोटी असे सुधारित करण्यात आले होते. त्यात ५८७६.१७ कोटींने घट झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये महसुली उत्पन्न २७ हजार ८११.५७ कोटी एवढे प्रस्ताविले असून ते सन २०२०- २१ पेक्षा ६३६.७३ कोटींनी कमी आहे. सन २०२१-२२ मध्ये जकाती पोटी नुकसान भरपाई म्हणून अनुदान १० हजार ५८३.०८ कोटी, मालमत्ता करापोटी ७ हजार कोटी, विकास नियोजन खात्यातून प्राप्त होणारे उत्पन्न २ हजार कोटी, गुंतवणुकीवरील व्याजापोटी ९७५.५६ कोटी, मलनिस्सारण आकारापोटी १५९८.०८ कोटी उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
इतर तरतुदी
- सागरी किनारा प्रकल्प - २००० कोटी
- गोरेगाव मुलुंड लिंक रोड - १३०० कोटी
- विकास नियोजन खाते - २५४६.६० कोटी
- मुंबईचे सौंदर्यीकरण - २०० कोटी
- कोविड संबंधी माहिती व्यवस्थापन आणि विश्लेषण प्रणाली - ५१.८९ कोटी
- सामुदायिक शौचालये - ३२३.२० कोटी
- पूरप्रवण क्षेत्राचे निवारण - १५० कोटी
- रेल्वेला पुलांसाठी - ९६१.६० कोटी
- नद्यांचे पुनरुज्जीवन - ११४९.७४ कोटी
- उद्याने - १२६.५३ कोटी
- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) - ४९.६७ कोटी
- मुंबई अग्निशमन दल - १९९.४७ कोटी
- महापालिका मंड्या - १२१.६३ कोटी