मुंबई - मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी जलप्रलय आला होता. यावेळी प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे नाल्यातील पाण्याचा निचरा झाला नसल्याचे समोर आले होते. यासाठी राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ( Mumbai BMC ) जून २०१८ मध्ये राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घातली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणार्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. महानगरपालिकेच्या लायसन्स विभागाकडून जून २०१८ ते मार्च २०२० पर्यंत प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्यात आली.
६७० किलोवर प्लास्टिक जप्त -मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाल्याने ही कारवाई बंद करण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर १ जुलैपासून पुन्हा प्लास्टिक विरोधी कारवी तीव्र करण्यात आली आहे. मॉल, मार्केट, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. १ जुलै ते ३१ जुलै या महिनाभरात १८ हजारापेक्षा अधिक ठिकाणी भेटी देऊन केलेल्या तपासणीत तब्बल ६७० किलोवर प्लास्टिक जप्त केले. या धडक कारवाईत १७७ जणांकडून ८ लाख ८० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.