मुंबई -राज्यभरात कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांच्या उपचारात ऑक्सिजनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोरोना व्हायरसमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. महाराष्ट्रातील सरकारी, खासगी रुग्णालयात सध्या हजारो कोरोना रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. आत्ता मुंबई महानगरपालिका मुंबईतील खासगी हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहे.
मागील तीन दिवसांपासून मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांना एका रुग्णालयातून दुसरीकडे हलवण्याची वेळ आली होती. तसेच ऑक्सिजनची कमतरता खासगी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे हॉस्पिटल प्रशासन रुग्णांना ऍडमिट करून घेत नव्हते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ऑक्सिजनची तरतूद सध्या 210 मेट्रिक टनवरून वाढवून 235 मेट्रिक टन इतकी केली आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत रुग्णांवर येणारा ताण कमी होण्याची अपेक्षा आत्ता मुंबई महानगर पालिकेला आहे.
मुंबईतील अनेक खासगी रुग्णालयात तसेच नर्सिंग होमला ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. काही रुग्णालयांवर नॉन कोविड रुग्णांना इतरत्र हलवण्याची वेळ आली. काही ऑक्सिजन उत्पादकांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पुरवठा होईल असे सांगितले होते. तर काही रिफिलरकडून याबाबत खात्रीने काही सांगता येत नव्हते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनापुढे ऑक्सिजनचे संकट उभे ठाकले होतं. हिंदुमहासभा रुग्णालयात 50 रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती. त्यांनाही दोन दिवसांपासून ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या भेडसावत होती. पाच लिटर पेक्षा कमी ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती यंत्राच्या आधारावर ठेवले होते. मात्र ज्या रुग्णांना त्याहून अधिक ऑक्सिजनची गरज लागत होती त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर शिवाय पर्याय नव्हता. स्थानिक वैद्यकीय अधिकारी तसेच पालिकेचे ऑक्सिजन पुरवठा संदर्भात तयार करण्यात आलेल्या मदत गटाला सातत्याने अपडेट दिले जात होते, अशी परिस्थिती पहिल्यांदा अनुभवत आहे असे हिंदू महासभा रुग्णालयाचे डॉक्टर यांनी बोलताना सांगितले.