मुंबई- जागतिक दर्जाचे शहर व भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे सर्वांचे लक्ष असते. अशा शहरातील तब्बल 1 कोटी 30 लाख नागरिकांना सोयी सुविधा देणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी, 2021 मध्ये होत आहे. त्यासाठी महिला व जातीनिहाय प्रभागांच्या आरक्षणासाठी दिवाळीनंतर लॉटरी काढली जाणार आहे. कोणत्याही विद्यमान तसेच इच्छुक उमेदवारांची दिवाळी खराब होणार नाही याची खबरदारी निवडणूक विभागाकडून घेण्यात आली आहे. यामुळे निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे.
पालिकेची निवडणूक
सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक दर पाच वर्षांनी होते. पालिकेची मागील निवडणूक 22 फेब्रुवारी, 2017 ला झाली होती. तर 9 मार्चला महापौर निवडणूक झाली होती. यामुळे सध्याच्या महापालिकेचा कार्यकाळ हा 8 मार्च, 2022 पर्यंत आहे. हा कार्यकाळ संपण्याआधी निवडणूक होऊन नवीन महापालिका अस्तित्वात येणे आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वी प्रभागांचे आरक्षण जाहीर केले जाते. यात जातीनिहाय तसेच महिला आरक्षण प्रभाग जाहीर केले जातात. निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर केली जाते त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते.
प्रभाग आरक्षण सोडत
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना निवडणूक विभागाने केल्या आहेत. त्यानुसार पालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. ही निवडणूक फेब्रुवारी, 2021 मध्ये होणार असल्याने ऑक्टोबर महिन्यात प्रभाग आरक्षण जाहीर होणे अपेक्षित मानले जात होते. पण, पितृपक्ष आणि त्यानंतर नवरात्र आदींमुळे हे प्रभाग आरक्षण जाहीर झाले नाही. सार्वत्रिक निवडणुकीआधी दर पाच वर्षांनी प्रभाग आरक्षण सोडत तर दर दहा वर्षांनी प्रभाग रचना केली जाते. त्यानुसार निवडणूक पार पाडली जाते.