मुंबई -शहरातील मुसळधार पावसात तुंबणारे पाणी साठवण्यासाठी पालिका प्रशासन भूमिगत जलबोगदे बांधण्याच्या विचारात आहे. हे साठलेले पाणी नंतर समुद्रात सोडले जाणार असून, या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे ऐन पावसाळ्यात पाणी तुंबण्यापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे. टोकियो शहरात राबवण्यात आलेल्या धर्तीवर या प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे. या उपक्रमाबाबत जपानच्या कंपनीने महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना सविस्तर सादरीकरण केले आहे.
मुसळधार पावसामुळे सखल भागात साचणाऱ्या पाण्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. दरवर्षीच्या पावसात ही परिस्थिती उद्वभवत असल्याने मुंबईकरांचे हाल होत आसतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने जलबोगद्यांची उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये टोकियो शहरात राबवण्यात येणारा ‘भूमिगत जलबोगदा’ हा उपक्रम शहरात राबवण्यासंबंधी विचार सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यासंबंधी कामाचा अनुभव असलेल्या जपानी कंपनीच्या अधिकारी-तज्ज्ञांनी प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये भूमिगत जलबोगद्यातील पाणी समुद्रात सोडण्याच्या पर्यायासोबतच या पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येऊ शकतो का, या संदर्भात अभ्यास करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.