मुंबई- मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला तेव्हापासून पालिकेने प्रभावी उपाययोजना राबवून कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मुंबई पालिकेने हाती घेतलेले उपाय, तंत्रज्ञान, वैद्यकीय उपचार आदी सर्व स्तरावर पालिकेने उत्तम कामगिरी बजावली. मात्र, या कालावधीत कोरोनावर लक्ष केंद्रीत करताना मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या निरीक्षणातून समोर आले आहे.
पाण्याच्या पुरवठ्यामध्ये विषमता
प्रजा फाऊंडेशनने ‘मुंबईतील नागरी सेवांबाबतची सद्यस्थिती’ या अहवालाचे प्रकाशन केले. त्यात, २०२०-२१ मधील पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. मुंबईत दर दिवशी दरडोई सरासरी १८८ लीटर पाणीपुरवठा होत असून, ते प्रमाण भारतीय मानकाच्या दरडोई १३५ लीटर पाणीपुरवठ्यापेक्षा अधिक आहे. मात्र शहरी आणि झोपडपट्टी भागात पाण्याच्या पुरवठ्यामध्ये विषमता असल्याचे प्रजा फाऊंडेशनने नमूद केले आहे. झोपडपट्टी भागात मीटरवर आधारित पाणीपुरवठा केल्यास तिथल्या रहिवाशांना मोठा आधार मिळेल, असेही स्पष्ट केले आहे.
झोपडपट्टीत नळाने पाणी द्या
पाण्याच्या समस्येबाबतही अहवालात काही निरीक्षणे प्रजाने नोंदवले आहेत. बिगर झोपडपट्टी क्षेत्रात दरडोई सरासरी १५० लीटर पाण्यासाठी महिना १९.४४ रु. दराने पाणीपुरवठा होतो. तर, झोपडपट्टी क्षेत्रात हेच प्रमाण ४५ लीटर पाण्यासाठी ४.८५ रु. इतके दर आहे. तसेच, झोपडपट्टीतील मागणीनुसार पाणीपुरवठा होण्यासाठी तिथल्या रहिवाशांना टँकर किंवा अन्य उपायांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे प्रजा फाऊंडेशनने म्हटले आहे. पाणी पुरवठ्यासाठी प्रतिमाह ५०० ते ५५० रुपये इतका ज्यादा खर्च करावा लागतो. त्याऐवजी पालिकेने या भागात नळजोडणीने दरडोई सरासरी १३५ लीटर पाणीपुरवठा मीटर नळजोडणीने दिल्यास हा खर्च १४.५४ रुपये इतका येऊ शकतो, अशी तुलनाही करण्यात आली आहे.