मुंबई -मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात साथीचे ( Rainy Season Disease ) आजार पसरतात. त्याचसोबत पावसाचे पाणी साचल्याने त्यातून चालणाऱ्या नागरिकांना लेप्टो होण्याचा धोका असतो. यासाठी पालिकेकडून उंदीर मारले ( BMC RAT kiiling ) जातात. जानेवारी २०१८ ते मे २०२२ या ५ वर्षांच्या कालावधीत तब्बल १६ लाख ४५ हजार १९ उंदीर मारल्याची माहिती पालिकेच्या कीटक नाशक विभागाकडून देण्यात आली आहे.
लेप्टो रोखण्यासाठी उंदीर मारले -मुंबईत दरवर्षी पावसाचे पाणी साचते. गेल्या काही वर्षात पाणी साचण्याच्या ठिकाणांत वाढ झाली आहे. साचलेल्या पाण्यातून नागरिकांना चालावे लागते. अशा पाण्यात प्राण्यांचे मूत्र ही असते. एखाद्या व्यक्तीच्या पायावर जखम असेल आणि तो साचलेल्या पाण्यातून गेल्यास त्याला लेप्टो स्पायरेसिस हा आजार होतो. लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी किटक नाशक विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येते. उंदरांना हाताने मारण्याबरोबरच अॅल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. मात्र पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र, ज्यावेळी दोन ते चार दिवस पाऊस पडत नाही, त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी जानेवारी २०१८ ते मे २०२२ या ५ वर्षांच्या कालावधीत तब्बल १६ लाख ४५ हजार १९ उंदीर मारण्यात आले. एका उंदराला मारण्यासाठी २२ रुपये देण्यात येतात. अशी माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.