मुंबई - कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचे उद्दीष्ट गाठण्यात मुंबई महापालिका बरीच मागे असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 36 हजार 390 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
मुंबई महापालिका कोरोना लसीकरणाच्या उद्दिष्टापासून लांबच! - corona
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाला सुरुवात होताना कोविन ऍपमध्ये अनेक अडचणी आल्या. यामुळे दोन दिवस लसीकरण बंद होते. 19 जानेवारीपासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्यात आली.
लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी
मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाला सुरुवात होताना कोविन ऍपमध्ये अनेक अडचणी आल्या. यामुळे दोन दिवस लसीकरण बंद होते. 19 जानेवारीपासून लसीकरणाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापार्यंत 10 सत्रात म्हणजेच दहा दिवसांच्या लसीकरणादरम्यान केवळ 36 हजार 390 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 5 हजार 865, सायन येथील टिळक रुग्णालयात 3 हजार 020, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमध्ये 4 हजार 094, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात 4 हजार 642, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात 1 हजार 051, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 6 हजार 210, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात 5 हजार 766, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटलमध्ये 4 हजार 114, बांद्रा भाभा हॉस्पिटलमध्ये 2 हजार 799, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटलमध्ये 262, सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये 1 हजार 389, गोरेगाव नेस्कोमध्ये 478 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण
16 जानेवारी रोजी 1926 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यानंतर 19 जानेवारीला 1597, 20 जानेवारीला 1728, 22 जानेवारीला 3539, 23 जानेवारीला 4374, 25 जानेवारीला 5005, 27 जानेवारीला 5197, 28 जानेवारीला 4430, 29 जानेवारीला 5510, 30 जानेवारीला 6351 अशा एकूण 36390 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
सौम्य दुष्परिणाम
16 जानेवारी रोजी लसीकरण झालेल्या दोघांना सौम्य दुष्परिणाम जाणवले. तर 19 जानेवारीला 3, 20 जानेवारीला 7, 22 जानेवारीला 2, 23 जानेवारीला 5, 25 जानेवारीला 10, 27 जानेवारीला 8, 28 जानेवारीला 6, 29 जानेवारीला 4, 30 जानेवारीला 9 अशा एकूण 61 आरोग्य कर्मचाऱ्यांना सौम्य दुष्परिणाम जाणवले.
इतका आहे लसीचा साठा
सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड' या लसीच्या १ लाख ३९ हजार ५०० डोसचा साठा १३ जानेवारीला मुंबईत दाखल झाला. तर गुरुवारी २१ जानेवारीला पहाटे दुसऱ्या टप्प्यात १ लाख २५ हजार डोस पालिकेला उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत पालिकेला २ लाख ६४ हजार ५०० लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. परळ येथील पालिकेच्या एफ साऊथ वॉर्डमध्ये लस साठवणूक केंद्रात ही लस ठेवण्यात आली आहे.
हळूहळू प्रमाण वाढेल
लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याबाबत पालिकेशी संपर्क साधला असता, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेता यावी म्हणून "वॉक इन वॅक्सिनेशन" कार्यक्रम राबवला जात आहे. यामुळे ऍपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांला तो कामावर असलेल्या विभागातील जवळच्या कोणत्याही केंद्रावर लस घेता येणार आहे. सध्या जे लस घेत आहेत त्यांच्यावर काही दुष्परिणाम होत नाही हे पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लस घेण्याचे प्रमाण हळूहळू वाढेल अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.