मुंबई -मुंबईत गेल्या ११ महिन्यात करण्यात आलेल्या उपायोयजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र लोकल ट्रेन सुरु होताच कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनी जाते की काय, अशी भिती व्यक्त केली जात आहे. मुंबईमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू नये म्हणून महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग ऍक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात आणि रेल्वेमध्ये विनामास्क नागरिकांवर कडक कारवाईचे तसेच लग्न कार्यालये, रेस्टॉरंटस्, नाईटक्लबवर धाडसत्र सुरु केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त रुग्णसंख्या वाढली-
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मागील ११ महिन्यांपासून राज्य व मुंबई महापालिकेचा कोरोनाशी लढा सुरू आहे. घरोघरी सर्वेक्षण, आरोग्य शिबीर, नियमित तपासण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तत्काळ शोध घेऊन विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्र, इमारती सील करून कठोर अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून प्रभावी उपाययोजना आदींमुळे कोरोना आटोक्यात आणण्यास पालिकेला यश आले. डिसेंबरनंतर नवीन वर्षाच्या प्रारंभापासून कोरोना उतरणीला लागला. रोज २६०० त २८०० पर्यंत सापडणारे कोरोना रुग्ण २ फेब्रुवारीला ३३४ वर आले. राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र, गर्दी वाढल्याने आठवड्याभरातच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ३३४ वर असलेली रुग्णसंख्या दुपटीने वाढून ७५१ वर पोहचली.
हे आहेत नवे हॉटस्पॉट -
मुंबईतील बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी भाग कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. सरकारच्या नियमांचे पालन न करणाऱ्या काही सोसायट्यांना पालिकेने नोटिस बजावल्या आहेत. या सोसायट्यानी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालिकेचा ऍक्शन प्लान -
लॉकडाऊनमध्ये शिथिलथा दिल्यावर नागरिकांकडून मास्कचा, सॅनिटायझर वापर न करणे, गर्दीच्या ठिकाणी कोविडच्या नियमांचे पालन न करणे, रेल्वेमधून प्रवास करताना मास्कचा वापर न करणे याकारणाने रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेने दर दिवसाला प्रत्येक वॉर्डमध्ये किमान ४ लग्न कार्यालये, ४ रेस्टॉरंटस् आणि किमान १ नाईट क्लबवर धाड टाकून कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न रेल्वेमधून मास्क न घालता प्रवासी प्रवास करत असल्याने तिनही मार्गांवर एकूण तीनशे मार्शल तैनात करून त्यांच्यामार्फत विनामास्क प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे. लक्षणे नसलेले पॉझिटीव्ह रुग्ण आणि होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना असलेले हाय रिस्क कॉन्टॅक्ट बाहेर फिरतांना आढळल्यास थेट एफआयआर दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 721 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 15 हजार 751 वर पोहचला आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 426 वर पोहचला आहे. 421 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 97 हजार 522 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5943 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 436 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 61 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 545 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 30 लाख 58 हजार 146 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
या विभागात वाढतेय रुग्णांची संख्या -
मुंबईतील बोरीवली आर सेंट्रल भागात सर्वाधिक रुग्ण संख्या असून ती २२ हजार ४९४ पर्यंत पोहचली आहे. अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम के वेस्ट या विभागात कोरोना रुग्ण संख्या २० हजार ८९१ वर पोहचली आहे. कांदिवली, चारकोप आर साऊथ या विभागात १९ हजार ०६७ कोरोना रुग्ण आहेत. मालाड, मनोरी, मारवे, अक्सा, मढ या पी नॉर्थ विभागात एकूण १८ हजार ९५४ कोरोना रुग्ण आहेत. अंधेरी पूर्व के ईस्ट या विभागात एकूण १८ हजार ६९६ रुग्ण आहेत. मुलुंडच्या टी विभागात एकूण १६ हजार १८२ रुग्ण आहेत.
येथे कंटेन्मेंट झोनची संख्या अधिक -
मुंबईत मुलुंड टी विभागात १७१, घाटकोपर एन विभागात १४२, आर सेंट्रल ४३, कुर्ला एल विभागात ३६, चेंबूर एम वेस्ट विभागात ३५, सांताक्रूझ एच ईस्ट विभागात २६, एम ईस्ट विभागात २१ इमारती सील आहेत. तर भांडुप पवई विक्रोळीच्या एस विभागात १०, घाटकोपर एन विभागात १०, कुर्ला एल विभागात ८, खार एच ईस्ट विभागात ६, चेंबूर एम ईस्ट विभागात ५, तर मुलुंड टी विभागात ४ झोपडपट्ट्या आणि चाळी कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत.
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने -
मुंबईत कोरोना नियमांचे पाळले जात नसल्याने मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. राज्य सरकारने नुकतीच आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कोरोना संदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करावी, असे आदेश सर्व महापालिका, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाला दिला आहे. मुंबई महापालिकेनेही कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये मास्क न घालता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता कारवाई केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरत नाहीत, अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या वाढली -
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, काल 16 फेब्रुवारीला 461 तर आज 721 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे लसीकरण स्थगित करण्यात आले होते. मात्र, १९ जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत ९५,०७२ आरोग्य आणि ३८,९५३ फ्रंटलाईन, अशा एकूण १ लाख ३४ हजार २५ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात ९५,०७२ आरोग्य आणि ३८,९५३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. लसीकरणाच्या सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली होती. आता दुसऱ्या डोसकडेही आरोग्य कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. तीन दिवसात फक्त ६७६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
अशा प्रकारे होणार कारवाई -
• गृह विलगीकरणासह लग्न समारंभ तसेच सार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱयांवर दाखल होणार गुन्हे
• पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणाऱ्या इमारती करणार प्रतिबंधीत (सील)
• होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या हातावर मारणार शिक्के
• विना मास्क रेल्वे प्रवास करणाऱयांवर कारवाईसाठी नेमणार ३०० मार्शल
• विना मास्क फिरणाऱया नागरिकांवर कारवाईसाठी मार्शल्सची संख्या होणार दुप्पट, दररोज २५ हजार जणांवर कारवाईचे लक्ष्य
• मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृहं इत्यादी ठिकाणी धाडी टाकण्याच्या सूचना
• ब्राझिलमधून मुंबईत येणारे प्रवासीदेखील आता संस्थात्मक विलगीकरणात
• रुग्ण वाढत असलेल्या विभागांमध्ये तपासण्यांची संख्या वाढवणार
हेही वाचा-महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता; विदर्भामध्ये स्थिती चिंताजनक