मुंबई - मुंबईमध्ये एकीकडे २६/११ ला झालेल्या दहशवादी हल्ल्याला ( 26/11 attack ) १३ वर्ष पूर्ण झाल्याने शहीद जवानांना अभिवादन केले जात असताना दुसरीकडे मात्र दहशतवाद्यांच्या नेहमीच निशाण्यावर असलेल्या मुंबई महापालिकेची सुरक्षा धोक्यात असल्याचे समोर आले आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील बॅग स्कॅनिंग करणाऱ्या मशीन बंद पडल्या ( Bag Screening Machines Shut Down ) आहेत. यामुळे पालिका मुख्यालयात येणाऱ्या कर्मचारी तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या बॅगांची तपासणीच केली जात नसल्याने महापालिका मुख्यालयाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
ईटीव्ही भारतचा प्रतिनिधी माहिती देताना मुंबईवर दहशहतवादी हल्ला -
मुंबईवर १३ वर्षांपूर्वी २६/११ ला पाकिस्तानी दशतवादी अजमल कसाब याने त्याच्या साथीदारांसह मुंबईवर हल्ला केला होता. हॉटेल ताजवर हल्ला झाला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर अजमल कसाबने अंधाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गोळीबार करत कसाबने मुंबई महापालिका मुख्यालय ( Mumbai Municipal Corporation Headquarters ) आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मधल्या रस्त्यावरही गोळीबार केला होता. यावेळी पालिकेच्या एका सुरक्षा रक्षकाच्या पायाला गोळी लागली होती. त्यानंतर मुंबई महापालिका नेहमीच दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर राहिली आहे.
पालिकेची सुरक्षा -
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, आयुक्त, वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त आदी नेते व अधिकारी उपस्थित असतात. पालिकेत सुमारे तीन हजार कर्मचारी काम करतात. तसेच मुंबईकर नागरिक तसेच विविध लोकप्रतिनिधी पालिका मुख्यालयाला भेट देत असतात. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिका मुख्यालयात येणाऱ्यांच्या तपासणीसाठी मेटल डिटेक्टर तसेच बागांची स्क्रिनींग करणाऱ्या मशीन बसवण्यात आल्या आहेत. सुरक्षा रक्षकांना हॅन्ड मेटल डिटेक्टरही देण्यात आले आहेत.
मशीन पडतायत वारंवार बंद -
मुंबई महापालिका मुख्यालयात बसवण्यात आलेल्या बॅग स्क्रिनींग मशीन वारंवार बंद पडत आहेत. या मशिन बंद पडल्यावर त्याच्या दुरुस्तीसाठी कमीतकमी आठवडाभर लागत आहे. या कालावधीत बॅगा तपासणी केल्या जात नाहीत. यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांकडून याचा फायदा घेतला जाण्याची शक्यता आहे, याबाबत पालिकेच्या सुरक्षा विभागाशी संपर्क केला असता या मशीन नेहमीच बंद पडतात. मशीन बंद पडल्या की टायची तक्रार दिल्यावर त्या मशीन दुरुस्त केल्या जातात, त्यानंतर पुन्हा या मशिन्स बंद पडत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा -26/11 Mumbai attacks : दहशतवाद्यांनी नातेवाईकाची हत्या केल्यानंतरही NSG प्रमुख जे.डी. दत्त यांनी चोख बजावले कर्तव्य