महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 3, 2021, 9:35 PM IST

ETV Bharat / city

पालिका देणार 'बेस्ट'ला ११५६ कोटी; आर्थिक परिस्थितीबाबत सल्लागार नेमला जाणार

बेस्ट उपक्रम महत्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने तिचा पुनरुज्जीवनाच्या नवीन पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे. याबाबतीत बेस्ट उपक्रमाने कृती आराखडा तयार करून त्यांची तूट कमी करण्यासाठी आणि जलद गतीने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत पालिका अंतिम निर्णय घेईल, असे आयुक्त म्हणाले.

मुंबई
मुंबई

मुंबई- मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेला 'बेस्ट' उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने आतापर्यंत २१०० कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यानंतरही बेस्ट आर्थिक अडचणीतून बाहेर न आल्याने पुन्हा ११५६ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केली आहे.

मुंबई

३२१९ कोटींची मदत -

मुंबई महापालिकेचा सन २०२१ - २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त बोलत होते. यावेळी बोलताना बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता आर्थिक आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. भांडवली उपकरणे खरेदी करणे, कर्जाची परतफेड, दैनंदिन खर्च भागविण्यासाठी पालिका बेस्टला आर्थिक मदत करत आहे. २०१५ पासून आतापर्यंत बेस्टला ३२१९ कोटींची आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. बेस्टने उपक्रमास सक्षम बनणे, प्रवासी केंद्रित, कार्यक्षम बनविणे, तूट कमी करणे, याकरिता तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्त म्हणाले.

सल्लागार नेमणार -

बेस्ट उपक्रम महत्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने तिचा पुनरुज्जीवनाच्या नवीन पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे. याबाबतीत बेस्ट उपक्रमाने कृती आराखडा तयार करून त्यांची तूट कमी करण्यासाठी आणि जलद गतीने आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत पालिका अंतिम निर्णय घेईल, असे आयुक्त म्हणाले. सार्वजनिक वाहतुकीचे महत्व लक्षात घेऊन २०२१ - २२ च्या अर्थसंकल्पात बेस्टला साहाय्य म्हणून ७५० कोटी रुपये दिले जाणार असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले.

कामगारांच्या ग्रॅच्युइटीसाठी ४०६ कोटींचे कर्ज -

बेस्टच्या सेवानिवृत्त झालेल्या ३,४४९ कामगारांना ग्रॅच्युइटीची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यासाठी कामगारांनी न्यायालयातही दाद मागितली. त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार थकीत ग्रॅच्युइटीच्या रक्कमेवर व्याज आणि व्याजावरील दंडाच्या स्वरूपात रकमेचा भार सहन करावा लागत आहे. व्याजाचा हा भार कमी करण्यासाठी पालिकेने बेस्ट उपक्रमास ग्रॅच्युइटीची थकीत असेलेली ४०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी कमी दराने व्याज आकारण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे

करोनाने मृत पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य -

मुंबईत कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद असताना बेस्टने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी सोडण्याचे काम केले. यात बेस्टच्या १०१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याच प्रमाणे बेस्टमधील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यासाठी पालिकेकडून बेस्टला निधी दिला जाईल अशी घोषणा आयुक्तांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details