मुंबई -वीज निर्मिती व विद्युत विभागाच्या खर्चात वाढ झाल्याने बेस्टने वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. तसा प्रस्ताव बेस्टने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) मंजुरीसाठी पाठवला आहे. एमईआरसीच्या वीज दरवाढीला परवानगी दिल्यास १ एप्रिलपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांवर बोजा पडणार असल्याने त्याला आमचा विरोध आहे, अशी माहिती पालिकेतील विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी दिली.
हेही वाचा... जयप्रभा स्टुडिओ विभाजन प्रस्ताव मान्य करू नका, स्टुडिओ बचाव शिष्टमंडळाची पालिकेकडे मागणी
सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करणारा विद्युत विभाग, अशी बेस्ट उपक्रमाची जगभरात ओळख आहे. मुंबई शहरात पुरवठा करणाऱ्या बेस्ट विद्युत विभागाचा वीज दर अन्य वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी आहे. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडे २ लाख व्यावसायिक व ८ लाख निवासी ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट टाटा पॅावरकडून ९०० मेगावॉट वीज खरेदी करते. मात्र वीज खरेदी ट्रान्समिशन खर्चात वाढ झाली आहे. तसेच विद्युत विभागाच्या खर्चातही वाढ झाल्याने वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव एमईआरसीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. दरम्यान, एमएमआरसीने वीज दरवाढीला परवानगी दिल्यास १ एप्रिलपासून वीज दरवाढ केली जाणार आहे.
हेही वाचा... 'काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला महाराष्ट्रातून मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील रहा'