मुंबई- कोरोनाचा असलेला प्रसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, जगभरात वाढलेले कोरोना रुग्ण या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर कोणत्याही नागरी सुविधा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीचे, शासकीय सलामीचे ऑनलाइन प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
कामाचा घेतला आढावा -
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अंत्यविधी मुंबईत दादर चौपाटी परिसरात झाला, ती जागा चैत्यभूमी स्मारक म्हणून साऱ्यांसाठी वंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे प्रतिवर्षी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी व परिसरात वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतली जातात. प्रामुख्याने चैत्यभूमी येथे सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा त्यात समावेश असतो. ही सर्व नियमित कामे सध्या सुरू आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांनी या कामांची पाहणी करून आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देशही दिले.
शिवाजी पार्कवर नागरी सुविधा नाही -
यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पाहता तसेच त्याची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, ती रोखण्यासाठी राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील सतर्क व सज्ज आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना प्रदान करून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तथापि, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. या कारणाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा अनुयायांना महापरिनिर्वाण दिनी उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
थेट प्रक्षेपण, घरी राहून अभिवादन -
यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, जेणेकरून अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरून अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष सोय करण्यात येत असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.
इंदू मिलचाही घेतला आढावा -
चैत्यभूमी येथील पूर्वतयारीची पाहणी केल्यानंतर जयस्वाल यांनी लगतच्या इंदू मिल येथेही भेट दिली. इंदू मिल जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक साकारत आहे. महापरिनिर्वाण दिनी येणारे अनुयायी इंदू मिल येथेही येतात. त्यामुळे तेथे दरवर्षी नेमकी कशी व्यवस्था केली जाते, त्याची माहिती जयस्वाल यांनी जाणून घेतली.या पाहणीप्रसंगी उपआयुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, सहायक आयुक्त किरण दिघावकर, सहायक आयुक्त शरद उघडे हे उपस्थित होते.