महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वृद्ध, लहान मुलांना राणीबागेत आणू नका, पालिकेची पर्यटकांसाठी नियमावली जाहीर!

मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. यासाठी आजही काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी राणीबागेत येणाऱ्या पर्यटकासांठी पालिकेने नियमावली बनवली आहे. या नियमावलीचे पालन करावे, तसेच वयोवृद्ध आणि ५ वर्षाखालील लहान मुलांना राणीबागेत शक्यतो करून आणू नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

राणीबाग
राणीबाग

By

Published : Oct 29, 2021, 8:47 AM IST

मुंबई - बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेली राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येत्या सोमवार १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु केले जाणार आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. यासाठी आजही काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी राणीबागेत येणाऱ्या पर्यटकासांठी पालिकेने नियमावली बनवली आहे. या नियमावलीचे पालन करावे, तसेच वयोवृद्ध आणि ५ वर्षाखालील लहान मुलांना राणीबागेत शक्यतो करून आणू नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

वयोवृद्ध, ५ वर्षाखालील लहान मुलांना आणू नका -

मुंबईमध्ये मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यावर राणीबागेत पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला होता. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर या वर्षी पर्यटकांना प्रवेश देण्यात आला. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा प्रवेश बंद करण्यात आला. मुंबईत सध्या कोरोना आटोक्यात असल्याने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पासून नियमित वेळेनुसार पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर प्रभातफेरीसाठी येणाऱया नागरिकांकरिता सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय पुन्‍हा खुले करण्यात येत आहे. प्राणिसंग्रहालयातील तिकीट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येईल. दिवसभरात, सुटीच्‍या दिवशी कोणत्‍याही वेळेस प्राणिसंग्रहालयामध्‍ये जास्‍त प्रमाणात गर्दी झाली असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास कोविड सुरक्षेच्‍या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता ताबडतोब बंद करुन तिकिट विक्री थांबविण्यात येईल. तसेच जेष्ठ नागरिक व लहान मुले (५ वर्षांखालील) यांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या नियमावलीचे पालन करा-

  • वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. मात्र, तिकिट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्‍यात येईल.
  • प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मुखपट्टी (मास्क) चा वापर अनिवार्य असेल.
  • कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव / संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि ५ वर्षाखालील लहान मुलांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्‍यावी.
  • कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे, गर्दी करू नये. दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.
  • प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत-कमी साहित्य आणावे. साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
  • प्रवेशद्वाराजवळील हात निर्जंतुकीकरण (सॅनिटायझर) सुविधेचा उपयोग केल्यानंतरच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.
  • प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने / समुहाने फिरू नये. प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.
  • कोविड विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.
  • प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये व थुंकू नये. कचराकुंडीचा वापर करावा.
  • एकवेळ वापराचे (सिंगल यूज) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱयाच्या डब्यात टाकावे.
  • कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्राणिसंग्रहालयातील जवळपासच्या सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा.
  • कोणतेही खाद्यपदार्थ प्राणिसंग्रहालयात आणू नये.
  • प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर प्रसाधनगृहातील साबण द्रावणाचा (लिक्वीड सोप) उपयोग करावा.

ABOUT THE AUTHOR

...view details