मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा रोखण्यात पालिकेला यश आले आहे. मुंबईमधील कोरोना ( Mumbai corona ) रोखण्याचे महत्वाचे काम पालिकेच्या आरोग्य विभागाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Additional Commissioner Suresh Kakani Retired ) यांनी केले आहे. आज ( शुक्रवारी ) अतिरिक्त आयुक्त काकाणी निवृत्त झाले आहेत.
पालिकेचा अनुभव कसा होता ? :मुंबई महानगरपालिकेत पोस्टिंग ही माझ्या जीवनातील जबाबदारी आणि जोखीमची पोस्टिंग होती. त्याच दरम्यान कोविडचा प्रसार झाला. महामारीच्या कार्यकाळात काम करता आले. लोकांपर्यंत पोहचता आले. नागरिकांना उपचार देणे, त्यांना मृत्यूच्या दाढेतून परत आणणे ही आव्हानात्मक जबाबदारी पार पडता आली याचे समाधान आहे. समाधान असले तरी त्यात सुधारणा करण्यात वाव आहे याची जाणीव ठेवून मुंबई महापालिकेने पाऊले उचलली आहेत, असे काकाणी म्हणाले.
कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोणती आव्हाने होती ? :सुरुवातीला पहिल्या लाटेच्या वेळेत रुग्णसंख्या किती वाढेल ? कोणती उपचार पद्धती द्यावी लागेल ? कोणत्या पद्धतीच्या मेडिकल सेवा आणि सुविधा द्यावी लागेल? याची काहीच माहीत नव्हती. याचा अंदाज काही दिवसात आल्यावर बेडची संख्या वाढवणे, औषधे उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर उपलब्ध करणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. पुढे या सेवा वाढवत गेलो. कोविड सेंटर उभारली. यामुळे मुंबईकरांना बेड मिळणे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळणे यासाठी काही अपवाद वगळता कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागलेला नाही, असे काकाणी यांनी संगितले.