मुंबई- महानगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या अग्निशमन दलातील २५ टक्के पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. रिक्त पदांची दखल घेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही पदे भरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू होईल, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या रिक्त पदांची आकडेवारी समोर आली होती. याबाबत दिनांक ६ सप्टेंबर २०२० रोजी लेखी तक्रार केली होती. यानुसार मुंबई अग्निशमन दलाने अनिल गलगली यांस कळविले आहे की, मुंबई महापालिकेने दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकामुळे रिक्त पदे भरता आलेली नव्हती. मात्र ९ सप्टेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्तांनी नवीन भरतीवर लावण्यात आलेल्या निर्बंधापासून अग्निशमन खाते वगळण्यास मान्यता दिली आहे. यानुसार ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.
अग्निशमन दल आणखी सक्षम होणार