मुंबई - मुंबईमध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडला ( Mumbai Monsoon Updates ) आहे. गेल्या २४ तासांत मुंबई शहरात १०७, पूर्व उपनगरात १७१.६८ तर पश्चिम उपनगरात १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. मात्र, पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे जलद गतीने पाण्याचा निचरा झाला आहे. गेल्या २४ तासांत २० ठिकाणी शॉर्टसर्किट, ३४ ठिकाणी झाडे, फांदया पडल्याच्या तर १८ ठिकाणी घरे आणि भिंती कोसळण्याच्या घटना नोंद झाल्या. यात एक महिला जखमी झाली असून, पोहायला गेलेले २ जण बुडले ( Different Accidents 1 Injured And 2 Drowned In Mumbai ) आहेत.
येथे साचले पाणी -शहर विभागात सायन सर्कल, सक्कर पंचायत, सायन रुगणालय, सायन रोड न २४, दादर टी टी, हिंदमाता, हिन्दु कॉलनी येथे पूर्व उपनगरात घाटकोपर स्टेशन, मानखुर्द स्टेशन, कल्पना सिनेमा, छेडा नगर, पोस्टल कॉलनी, सम्राट अशोक नगर, इ एस इ एस कॉलेज, कुर्ला स्टेशन, मानखुर्द सबवे, शेल कॉलनी येथे तर पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे, अंधेरी मार्केट, मिलन सबवे, खार सबवे, नॅशनल कॉलेज वाद्रा, दहीसर सबवे या ठिकाणी पाणी साचले होते. सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा जलद गतीने झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत पडलेल्या पावसाची दृष्य
२० ठिकाणी शॉर्टसर्किट -शहरात १०, पुर्व उपनगरात ०४ व पश्चिम उपनगरात ०६ अशा एकूण २० ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले असून, त्यात कोणीही जखमी झालेले नाही.
३४ ठिकाणी झाडे, फांदया पडल्या -शहरात १०, पूर्व उपनगरात ०४ व पश्चिम उपनगरात २० अशा एकूण ३४ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. सदर तक्रारी पडताळणीकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आल्या. फांद्या तोडण्याचे व उचलण्याचे काम सुरु आहे. यात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१८ ठिकाणी घरे कोसळली, एक जखमी -शहरात ०९ व पूर्व उपनगरात ०४ व पश्चिम उपनगरात ०५ अशा एकूण १८ ठिकाणी घर/भिंतीचा काही भाग पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. सदर तक्रारी संबंधित विभागांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आले. ५ जुलै रोजी सांयकाळी ०५.५४ वाजता अग्निशमन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार बी एस टी वसाहत सायन बाद्रा लिंक रोड, टी जंक्शन, धारावी या ठिकाणी तळ मजला अधिक एम मजली असलेल्या जॉन डोमिन चाळ मधील पहिल्या मजल्यावरील सिलिंगचा काही भाग पडून गोपी सावंत (महिला / ६५ वर्षे) यांच्या डोक्याला किरकोळ मार होता. त्यांना रहेजा रुग्णालय, माहीम येथे उपचार करण्याकरीता दाखल करून घेण्यात आले.
वाहतूक वळवली - बुधवारी सकाळी ९ वाजता प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर व उपनगरात सूरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे खालील ठिकाणचे वाहतूकीचे मार्ग बी ई एस टी मार्फत वळविण्यात आले आहेत. शहर विभागात सायन रोड नं. २४, हिंदमाता, गांधी मार्केट, भरणी नाका सेक्टर न ७ , एन्टॉप हील येथे पुर्व उपनगरात शेल कॉलनी, चेंबूर २ शितल सिनेमा कुर्ला, नरमेडेश्वर मंदिर, मडाला येथे तर पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज बांद्रा, एअर इंडिया कॉलनी, विरा देसाई रोड येथे पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था वळवण्यात आली होती. पाण्याचा निचरा झाल्यावर वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात आली आहे.
२ जण बुडाले -५ जुलै रोजी सायंकाळी ०६.५० वाजता अग्निशमन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र खदान, सुहासिनी पावस्कर मार्ग, वैशाली नगर, दहीसर ( पुर्व ) या ठिकाणी दोन माणसे खदान मध्ये बुडाल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यामधील एकाला महानगरपालिकेचे जीवरक्षक व स्थानिक मच्छीमार यांनी वाचविले व उपचारार्थ शताब्दी कांदिवली ( पश्चिम ) रुग्णालयात दाखल केले. शताब्दी, कांदिवली ( पश्चिम ) रुग्णालयातून प्राप्त माहितीनुसार शेखर पपु विश्वकर्मा ( वय 19 ) यास मृत घोषित करण्यात आले. बुडालेल्या दुस-या व्यक्तिचे शोधकार्य अग्निशमन दल व नौदलाच्या पाणबुड्यांमार्फत सुरु आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा -Ship sank in Arabian Sea: पोरबंदरहून यूएईला जाणारे जहाज अरबी समुद्रात बुडाले, 22 जणांना वाचवले