मुंबई -मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. क्वारंटाईन व लक्षणे नसलेले रुग्ण होम क्वारंटाईन न राहता बाहेर फिरताना आढळून येत आहेत. असे रुग्ण आता पालिकेच्या रडारवर असणार आहेत. क्वारंटाईन असलेले रुग्ण घरी आहेत की नाही याची दिवसातून चार वेळा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी त्यांच्या लँडलाईन क्रमांकावर फोन करून खातरजमा करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईत रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन पुन्हा ऍक्टिव्ह झाले आहे. पालिका आयुक्तांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. कोरोनाचे लक्षणे नसलेले रुग्ण आणि होम क्वारंटाईन असलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळून आले आहेत. त्यापैकी काही जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हे रुग्ण इतरांच्या संपर्कात आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, पालिका आयुक्तांनी हे रुग्ण घरी आहेत की नाही हे तपासण्याचे आदेश पालिकेच्या वॉर्डवॉर रूमला दिले आहेत. त्यांना घरातच राहण्याविषयी पुन्हा सूचना द्यावी. या अनुषंगाने रुग्णाच्या घरी लॅण्डलाईन दूरध्वनी असल्यास त्यावर प्राधान्याने संपर्क साधावा असा आदेश आयुक्तांनी आढावा बैठकीत दिला आहे.
...तर कायदेशीर कारवाई
विवाह सोहळे, जिमखाना क्लब, नाईट क्लब, उपहारगृहे, चित्रपट गृह, सर्व धार्मिक स्थळे, खेळाची मैदाने, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, खासगी कार्यालये आदी सर्व ठिकाणी मास्कचा वापर प्रत्येकाने करणे बंधनकारक आहे. विवाह सोहळा, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम यामध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्ती सहभागी होण्यास परवानगी आहे. सर्व चित्रपट गृह, नाट्यगृह, उपहारगृह आणि खासगी कार्यालय यामध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तींना परवानगी असेल. समारंभ कार्यक्रम, खासगी कार्यालये आदी ठिकाणी या मर्यादांचे उल्लंघन केलेले आढळून आले आणि त्या ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे आढळले तर संबंधित व्यक्तीकडून दंड आकारण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापनच्या व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
बैठकीत देण्यात आलेले आदेश
१. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या व्यक्तींना कोविड संबंधी लक्षणे आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारीत केलेल्या ठिकाणी अथवा खासगी वैद्यकीय प्रयोग शाळेत करावी.
२. सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना यापूर्वीच देण्यात आलेल्या सूचनांनुसार कोरोनाबाधितांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे प्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेला कळविणे बंधनकारक आहे. तसेच बाधित व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास, कोरोनाचा अहवाल महापालिकेसोबतच त्या रुग्णालयाला देखील कळवावा.