महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'भूमाफिया टोळीचा सक्त बंदोबस्त करण्यात येईल'

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील, मानखुर्द मंडाळा येथील भंगार गोदामाला आज दुपारी आग लागल्याची घटना समजताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अ‌ॅड. सुहास वाडकर यांनी घटनास्थळाकडे तत्काळ धाव घेतली.

kishori
kishori

By

Published : Feb 5, 2021, 7:37 PM IST

मुंबई - मानखुर्द मंडाळा येथील भंगार गोदामाला आग लागली असून अनेक गोदामे जळून खाक झाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर झोपडपट्टीतील गोदामाला आग लागली. या ठिकाणी कारवाई केली जाते मात्र पुन्हा भूमाफिया सक्रिय होतात. त्यासाठी भूमाफिया टोळीचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

जाणून घेतली सविस्तर माहिती

मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवरील, मानखुर्द मंडाळा येथील भंगार गोदामाला आज दुपारी आग लागल्याची घटना समजताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अ‌ॅड. सुहास वाडकर यांनी घटनास्थळाकडे तत्काळ धाव घेतली. तसेच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर बोलताना महापौरांनी ही माहिती दिली.

'भूमाफिया टोळीचा बंदोबस्त करणार'

यावेळी महापौर म्हणाल्या, की आज या ठिकाणी जी आग लागली आहे, ही जागा जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येत असून याठिकाणी अवैधपणे ऑइलचा साठा करण्यात येत असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका "एम/पूर्व" विभाग कार्यालयाच्या वतीने तसेच स्थानिक नगरसेविकेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला वेळोवेळी कळविण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका व पोलिसांच्या मदतीने अनेक वेळा कारवाईसुद्धा झाली. परंतु कारवाईची पाठ फिरताच पुन्हा भूमाफिया तिथे सक्रिय होऊन अवैध अड्डे स्थापन करीत असतात. त्यातूनच आजची ही दुर्घटना घडली असल्याचे महापौरांनी सांगितले. आजच्या या दुर्घटनेमुळे भूमाफिया टोळीचा सक्त बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

'आग पसरू नये म्हणून खबरदारी'

बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशामक दलाच्या वतीने या ठिकाणी १४ पाण्याच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच "एम/पूर्व '' विभाग कार्यालयाचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी जेसीबी व इतर सर्व आवश्यक त्या साहित्यासह अग्निशामक दलाला सहकार्य करून आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग मानवी वस्तीमध्ये अधिक पसरू नये, यासाठी अग्निशामक दलाच्या वतीने अधिक खबरदारी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका समीक्षा सक्रे उपस्थित होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details