मुंबई - पवई येथील ह्युंदाई कंपनीच्या शोरूम(hundai showroom)ला सकाळच्या सुमारास आग लागली. ही आग विझवली जात असून आगीच्या ठिकाणी जाण्यास अग्निशामक दला(firbrigade)च्या वाहनांना अडचणी येत आहेत. या आगीची अग्निशामक दलाकडून चौकशी करून त्याचा अहवाल आल्यावर कारवाईचा विचार केला जाईल. मात्र आगीच्या आणि घटनास्थळी पोचण्याच्या ठिकाणी पार्किंगमुळे अडचणी येत आहेत. यासाठी रस्ते मोकळे ठेवा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) यांनी केले आहे.
'आग विझवणाऱ्या गाड्या पोहोचणार कशा?'
पवई येथील साकी विहार रोड, एल अँड टी कंपनीच्या गेट क्रमांक 6जवळ ह्युंदाई कंपनीचे शोरूम आहे. या शोरूमला सकाळी 11च्या सुमारास आग लागली. या आगीच्या घटनस्थळाला पेडणेकर यांनी भेट दिली. त्यावेळी महापौर बोलत होत्या. आग कशामुळे लागली याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत काहीही बोलणे योग्य नाही. आत अडचणी आहेत. पार्किंगची समस्या आहे. सर्व काही पालिकेने केले पाहिजे, हे योग्य नाही. येथील मॅनेजमेंट आणि लोकांचीही जबाबदारी आहे. याठिकाणी येण्यासाठी रोड आहे. त्यावर गाड्या पार्क केल्या आहेत. अशावेळी आग लागली किंवा एखादी घटना घडली तर आमच्या आग विझवणाऱ्या गाड्या पोहोचणार कशा, असा प्रश्न उपस्थित करत अग्निाशमक दलाच्या गाड्या येण्यासाठी रस्ते मोकळे ठेवलेच पाहिजेत. अग्निशामक दल आगीचा अहवाल देतील, त्यानंतर काय कारवाई करायची ते ठरवू, असे महापौर म्हणाल्या.
ह्युंदाई कंपनीच्या शोरूमला आग
ही आग लेव्हल 1ची म्हणजेच छोटी आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे 5 फायर इंजिन आणि 4 वॉटर टँक घटनास्थळी दाखल झाले. यात अद्याप कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली. पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. या आगीमुळे आणि बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीचादेखील सामना करावा लागला.