मुंबई -आधुनिक कुलूपबंद पद्धतीने मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व मॅनहोलची झाकणे बसविण्यात यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. भांडूप येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसाप्रसंगी निघाल्याची आणि त्यामुळे दोन महिला त्यात पडताना वाचल्याची घटना घडली. या घटनेची महापौर किशोरी पेडणेकर यांनी गंभीरतेने दखल घेऊन आज भांडूप गावातील संबंधित घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
सर्व मुंबईत झाकणे लावण्याच्या सूचना
भांडूप व्हिलेज रोडच्या पदपथावर काल मॅनहोलचे झाकण खचून दोन महिला गटारात पडल्या होत्या. याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर मुंबईच्या महापौर घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी या ठिकाणची पाहणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेले फायबरचे निकृष्ट दर्जाची मेनहोलची झाकणे पालिकेने बदलून आता या ठिकाणी लोखंडी मजबूत झाकणे लावण्यास सुरुवात केली आहे. याची पाहणी केल्यानंतर महापौरांनी मुंबईच्या पदपथावरील अशी झाकणे बदलून लोखंडी झाकणे बसविणार असल्याचे सांगितले. सदरची झाकणे ही निकृष्ट दर्जाची नाहीत, लोखंडी झाकणे चोरी होऊ लागल्याने ही झाकणे पालिकेने लावली होती. पाणी आणि हवेच्या प्रेशरने झाकण खचले हे धोकादायक आहे. याबाबत सर्वांना सूचना दिल्या आहेत. पदपथावरील झाकने लोखंडी करण्याचे सांगितले आहे. सगळ्या मुंबईत ही झाकणे लावण्यास सांगितले आहे.