मुंबई - विरोधकांना लस केंद्र सरकारकडून मिळते हे चांगले माहीत आहे. त्यानंतरही लसीवरून महापालिकेवर टीका करत आहेत. विरोधकांनी केंद्र सरकारकडून लस आणून दाखवावी, आम्ही त्यांचा भर चौकात सत्कार करू, असे आव्हान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हेही वाचा -नौदलाच्या अधिकाऱ्याविरोधात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
महापौरांचे विरोधकांना आव्हान
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. लसीचा तुटवडा असल्याने पालिकेने १ कोटी लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडरही काढले होते. मात्र, त्यात योग्य पुरवठादार आले नसल्याने ते रद्द करण्यात आले. यावर भाजपने पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. यावर उत्तर देताना महापौरांनी लस आणल्यास भर चौकात सत्कार करू, असे आव्हान विरोधकांना दिले आहे.
विरोधक जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यांना लस केंद्राकडून मिळत आहे हे माहीत आहे. पालिकेलाच काय तर राज्यालाही लस मिळत नाही. हे आपल्या राज्यसोबत नाही इतर राज्यांबरोबरही होत आहे. त्यांनाही लस मिळत नाही, अशी त्यांची बोंब आहे. विरोधक जो टाहो फोडत आहेत तो त्यांनी केंद्राकडे फोडावा. राज्याला आणि मुंबईकडे लसीचा ओघ येऊ दे. लस आली तर भर चौकात तुमचे स्वागत करू, असे आव्हान महापौरांनी विरोधकांना दिले.
पालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द
मुंबईमध्ये दीड कोटी नागरिक राहत असून त्यांचे लसीकरण लवकरात लवकर करता यावे यासाठी पालिकेने राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे लसीची मागणी केली. त्यानंतरही लसीचा पुरवठा हवा तसा होत नसल्याने अनेकवेळा लसीकरण ठप्प ठेवावे लागत आहे. मुंबईकरांना लसीकरण करता यावे म्हणून पालिकेने लसीच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुरवठादार कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले. १० पुरवठादार कंपन्यांनी प्रस्ताव पाठवले होते. मात्र, त्यापैकी एका कंपनीने माघार घेतल्याने ९ पुरवठादार राहिले होते. या ९ पुरवठादारांच्या कागदपत्रांची, तसेच लस उत्पादक कंपनीसोबत असणाऱ्या त्यांच्या कायदेशीर संबंधांची तपासणी केली जात होती. यासाठी पालिकेचे दोन अतिरिक्त आयुक्त काम करत होते. पुरवठादार आणि लस बनवणाऱ्या कंपन्या यांच्यामधील कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या. त्यानंतर एकही पुरवठादार कंपनी १ कोटी लसीचा पुरवठा करू शकत नाही, हे स्पष्ट झाल्याने पालिका प्रशासनाने ग्लोबल टेंडर रद्द कारण्याचा निर्णय घेतला आहे. लस पुरवठ्याबाबतच्या या ग्लोबल टेंडरसाठी १८ मे आणि २५ मे रोजी अशी दोनदा मुदतवाढ दिली होती.
हेही वाचा -वांद्र्यात इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, ५ जण जखमी