मुंबई - गेले अडीच महिने बंद असलेली मुंबईची 'लाईफलाईन', म्हणजेच लोकल आजपासून सुरू होत आहे. मात्र, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच या गाड्या रुळावर धावणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार 15 जून पासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्याला रेल्वे बोर्डाने रविवारी रात्री उशीरा मंजुरी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्राकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत रेल्वे बोर्ड, राज्य शासन व पालिका यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवून प्रवास करता येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी 5.30 वाजता पहिली लोकल सुटेल तर रात्री 11.30 वाजता शेवटची लोकल सुटेल. प्रत्येक फेरी मागे 15 मिनिटांचे अंतर असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर 12 डब्याच्या एकूण 120 लोकल धावतील. चर्चगेट ते डहाणू रोड दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 60 फेऱ्या धावतील. जास्तीतजास्त फेऱ्या या चर्चगेट ते विरार दरम्यान होतील. मात्र काही फेऱ्या या डहाणू रोड पर्यंत चालवण्यात येतील. सर्व जलद लोकल बोरिवली ते चर्चगेट स्थानकादरम्यान धावतील.
मध्य रेल्वे मार्गावर एकूण 200 फेऱ्या चालवण्यात येतील. त्यातील 100 अप आणि 100 डाऊन मार्गावर धावतील. सीएसएमटी ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे मार्गावर 135 फेऱ्या होतील. त्यात अप मार्गावर 65 आणि डाऊन मार्गावर 65 फेऱ्या होतील. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर अप-डाऊन अशा प्रत्येकी 35 म्हणजे एकूण 70 फेऱ्या होतील. महत्वाच्या जलद मार्गावरील स्थानकातच या लोकलला थांबा मिळेल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गाच्या कामाच्या शिफ्ट नुसार सीएसएमटी स्थानकात लोकलची वेळ ही सकाळी 7, 9, 10 आणि दुपारी 3, तर रात्री 9 आणि 11 अशी असणार आहे. तर सीएसएमटी स्थानकातून सुटण्याची वेळ सकाळी 7, 9 आणि दुपारी 3, 5 तर रात्री 9 आणि 11 अशी असणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 1 लाख 25 हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करतील, असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रवासी सूचना व नियमावली -
- या स्पेशल उपनगरीय गाड्यांमध्ये फक्त राज्य शासनाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणत्याही सामान्य प्रवासी यांना प्रवास करता येणार नाही.
- सिझन तिकीट काढण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेवर तिकीट खिडकी उघडण्यात येतील, त्यासाठी देखील संबंधित व्यक्तीला त्याच शासकीय ओळखपत्र दाखवावे लागेल.
- लॉकडाऊन मध्ये सिझन तिकीटची मर्यादा संपली असल्यास त्याला रेल्वेने आधीच जाहीर केल्याप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच युटीएस काउंटरवर देखिल नवीन तिकीट देण्याची सोय करण्यात आली आहे.
- रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आधीपासूनच लोकलने प्रवास करत आहेत. आरपीएफ व जीआरपी, महाराष्ट्र पोलीस यांची विविध स्थानकांवर नेमणूक करण्यात आली आहे.
- वैद्यकीयदृष्ट्या सक्षम व कंटेन्ट झोनमधून नसलेल्याची दक्षता घेतल्यानंतर सर्वांना प्रवास करण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन राज्य सरकारला करण्यात आले आहे.
- शारिरीक अंतर राखून 1,200 ऐवजी 700 प्रवासी एका लोकलमधून प्रवास करू शकतील.
- राज्य सरकारला सल्ला देण्यात आला आहे की स्थानकांवर आणि गाड्यांच्या आत गर्दी होणार नाही यासाठी विविध भागातून येणाऱ्या कामगारांच्या कार्यालयाची वेळ निश्चित करावी.
- स्थानकाच्या 150 मीटर परिसरात पार्किंग आणि फेरीवाले यांना प्रतिबंध असेल.
- स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर गर्दी होणार नाही याची खबरदारी संबंधित पालिकेने घ्यावी.
- वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह प्रत्येक स्थानकात एक रुग्णवाहिका तैनात करण्यात येईल.
राज्य शासनाने जाहीर केलेले ओळखपत्र दाखवुनच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. नंतर, कर्मचार्यांना क्यूआर आधारित ई-पास दिले जातील, ज्यामध्ये स्विफ्टटर तिकीट तपासणी सक्षम करण्यासाठी कलर कोडिंग देखील दिले जाईल. राज्य सरकारही ते सुनिश्चित करेल. राज्य सरकारने निश्चित केलेल्या आवश्यक कर्मचार्यांना या गाड्यांमध्ये चढता यावे यासाठी रेल्वे तसेच राज्य सरकार तपासणीच्या अनेक फेऱ्या सुनिश्चित करतील.
हेही वाचा :Coronavirus: राज्यात कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा ५० हजारांवर, रविवारी ३,३९० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर