मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानंतर सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले. मुंबईत कोरोना संसर्गाचा धोका अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांवर नाताळ सण आला असून, नवीन वर्षाची धामधूम सुरू होईल. यावेळी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सामान्यांकरिता लोकलचा निर्णय नव्या वर्षातच घेण्यात येणार असल्याची माहिती, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तर दुसरी लाट -
मुंबईत सणासुदीच्या काळानंतर कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता होती. पालिकेने राबवलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. सध्या ७०० ते ८०० पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. ही स्थिती समाधानकारक असली तरी कोरोनाचा धोका अजून कायम आहे. अशाच स्थितीत नाईट क्लबप्रमाणे नियम धाब्यावर बसवून शेकडो लोक विनामास्क एकत्र गर्दी करणार असतील तर दुसरी लाट येण्यास विलंब होणार नाही. येत्या काही दिवसांनंतर ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. थर्टीफर्स्टला सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. सध्या तरी लोकल सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व सामान्य मुंबईकरांना आता नव्या वर्षात लोकलचे दरवाजे खुले होणार आहेत. लोकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
रुग्णवाढ पाच टक्क्यांवर -
विविध उपाययोजना राबवून पालिकेने कोरोना नियंत्रणात आणला. मे-जूनमध्ये १०० चाचण्या केल्या तर ३८ टक्के रुग्ण आढळून येत होते. ४ डिसेंबरला हे प्रमाण ५ टक्क्यांवर आले आहे. ७ डिसेंबरपर्यंत ४ टक्के त्यानंतर ८, ९ व १० डिसेंबरपर्यंत हे प्रमाण ५ टक्केवर असून जवळपास आठवडाभर कायम राहिले आहे. सौम्य व कोणतीही लक्षणे नसलेले ७४२ रुग्ण आढळले आहेत. तर प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या १२० आहे. पालिकेच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई तीव्र -
मुंबईकरांच्या सहकार्यामुळे कोरोना नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. मात्र अजूनही लस आलेली नसल्याने सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करणे आवश्यक झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावता फिरल्यास कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.