मुंबई - सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवासात वेळेची मर्यादा घालवून सोमवारपासून सर्वांसाठी लोकल सुरू करण्यात आली आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या समस्यांना लक्षात घेता लोकल सेवेची वेळ बदलण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे.
काय म्हणाले आरोग्य मंत्री?
मुंबईकरांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार लोकलच्या वेळेत लवकरच बदल करण्यात येतील, असे टोपे यांनी सांगितले आहे. टोपे म्हणाले की, मुंबईकरांची सोय आणि अडचणी लक्षात घेऊन वेळेच्या बाबतीत काही करता येत असेल तर ते नक्की केले जाईल, त्यासाठी संबंधीत विभागांकडे पाठपुरावा केला जाईल.
हेही वाचा -ऊसतोड कामगारांच्या मुलांचा नाशकात चक्क बिबट्याच्या बछड्यासोबत सेल्फी
मुंबईकरांचा हिरमोड
कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तब्बल 11 महिन्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांना तीन टप्प्यात प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यात सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत दुपारी १२ पासून ते दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. त्यानुसार यावेळी गर्दीचे प्रमाण वाढले आहे. तर अनेकांना लोकल सेवेचा फायदा होत नाही. त्यामुळे अनेक लोकल प्रवाशांचा हिरमोड झालेला आहे.
लोकल प्रवासी वाढले
१ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी उघडली आहे. मध्य रेल्वे मार्गावरून सोमवारी, संपूर्ण दिवसभरात सुमारे 20 लाख 50 हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर, पश्चिम रेल्वे मार्गावरून संपूर्ण दिवसभरात सुमारे 16 लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर, 29 जानेवारी रोजी मध्य रेल्वे मार्गावरून 13 लाख तर, पश्चिम रेल्वे मार्गावरून 9 लाख 50 हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून आले.
हेही वाचा -अनलॉकनंतर नाशकात गुन्हेगारी वाढली; 171 हाणामारी, तर 12 खुनाचे गुन्हे