मुंबई- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोविड संबंधित नियमांचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. व्यवस्थापन, अंमलबजावणीसाठी महापालिकेचे क्लिनिक मार्शल, रेल्वे पोलीस रेल्वे स्थानकावर तैनात केले आहेत. "नो मास्क नो एन्ट्री" मोहीम सुरू केली तसेच विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. क्लिनिक मार्शल आणि प्रवाशांमध्ये भांडणे होत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या पोलीस आणि क्लिनप मार्शलची डोकेदुखी वाढली आहे.
आदेशाचे पालन नाही -
कोरोनामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असलेल्या लाेकलची दारे वेळेचे बंधन घालत अखेर १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी उघडली आहेत. सर्व प्रवाशांसाठी लाेकल सुरू करताना गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतराचे नियम पाळले जातील, याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, या आदेशाचा पूर्णता फज्जा उडालेला आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवासी तोंडाला मास्क लावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
पालिकेची 500 पथके तैनात-
रेल्वे प्रवासात कोविड नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पालिकेने ५०० पथके तयार करून ती कार्यरत केली आहेत. रेल्वे स्थानके व गाडीतही प्रवाशांना नियम पाळण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून करण्यात येते. तरीही काही प्रवासी नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर पालिकेने नेमलेले पथक दंडात्मक कारवाई करत आहे. या कारवाईदरम्यान पालिका कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये तू-तू, मैं-मैं होण्याचे प्रकार घडत आहे.
पोलिसांना मध्यस्थी करावी लागते-
विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर सध्या बीएमसीकडून धडक कारवाई सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान पालिका कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भांडणे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मग पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. प्रवाशांना गाडीत सामाजिक अंतराचे पालन करता येत नाही, किमान मास्कने तोंड व नाक झाकण्याच्या नियमांचे पालन तरी करावे ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे आवाहन केले जात आहे.
नागरिकांकडून नियमांचे पालन नाही-
रेल्वे आणि बसमध्ये प्रवास करताना सामाजिक अंतर ठेवा, मास्कने तोंड व नाक व्यवस्थित झाकून घ्या, सॅनिटायझरची बाटली जवळ ठेवून हात स्वच्छ ठेवा, असे आवाहन रेल्वे, पालिका व राज्य सरकारतर्फे सातत्याने करण्यात येते. "नो मास्क नो एन्ट्री" चे फलकही पालिकाकडून बसविण्यात आलेला आहे. तसेच प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी लावले आहेत. मात्र, अनेक नागरिक या नियमांचे पालन करत नाहीत.
रेल्वे स्थानकांवर रोज तू तू, मैं मै-
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी २२ मार्च २०२० पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोविड पूर्णतः गेलेला नाही पण त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ठराविक वेळेचे बंधन घालून १ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. पण, प्रवासी मास्क वापरण्यासंदर्भात सांगितलेल्या नियमांचे पालन करीत नसल्याने रेल्वे फलाटावर पालिकेने नेमलेल्या क्लीनप मार्शल सोबत दंडाची आकारणी होत असताना रोज तू तू मैं मैं होत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन -
सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यात आली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना विषाणू पूर्णपणे गेला नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी कोविडच्या आखून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आले, मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी आणि रेल्वेचे पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी रेल्वे प्रवाशांना केले.