मुंबई - मुंबईमध्ये पावसाळ्यात पडझडीचे सत्र सुरु होते. आज ( 7 जुलै ) सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील मस्जिद रेल्वे स्थानकाजवळ भिंतीचा काही भाग रुळावर ( Track Wall Collapsing Near Masjid Road Station ) कोसळला. यामुळे काही काळ रेल्वे सेवा ( Mumbai Local Train )बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारी दोन तासाहून अधिकचा विशेष मेगाब्लॉक घेऊन धोकादायक भिंत पाडून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली. यादरम्यान हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
कोसळली वाहतूक बंद - मुंबईमध्ये २९ जून पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे आज सकाळी हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकाजवळ असलेल्या एका खासगी इमारतीमधील भिंतीचा काही भाग सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास रुळावर कोसळला. या दुर्घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा दरम्यान लोकल सेवा काही वेळ ठप्प झाली होती. भिंतीचा उर्वरित भाग पुन्हा कोसळण्याचा धोका लक्षात घेता मध्य रेल्वेने २ ते ४ या वेळेत विशेष मेगा ब्लॉक घेतला होता. सायंकाळी ४ वाजेपर्यंत भिंत पाडण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र, रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने हार्बर मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटं उशीराने धावत होत्या.