मुंबई -सन २०१९- २० या वर्षाकरता सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून बृहन्मुंबई महापालिकेला जल निर्मलता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. उपायुक्त अजय राठोरे यांनी हा पुरस्कार हैदराबाद येथे नुकत्याच एका विशेष कार्यक्रमात स्वीकारला. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात जल विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रातील पाणीपुरवठयात बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सुधारणा केल्या असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
पाण्याच्या दर्जाबाबत पुरस्कार
भारतातील नामांकित अशा 'इंडियन वॉटर वर्क्स' असोसिएशनतर्फे दरवर्षी "जल निर्मलता" पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार विशेषतः नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा क्षेत्रातील तंत्रज्ञान, कुशल प्रशासन आणि उच्च प्रतिच्या व्यवस्थापनातून पाण्याचा दर्जा सुधारून पाणीपुरवठा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात येतो. पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्राहक व्यवहार मंत्रालय , यांच्यातर्फे देशातील २१ शहरामध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून, पाण्याच्या विविध ४७ मानकांकरिता तपासण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भागातील वरळी, करी रोड, शिवडी, पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवली, जोगेश्वरी तसेच पूर्व उपनगरातील पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. त्यातील सर्व नमुने ४७ मानकांकरीता योग्य आढळले असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.