मुंबई -मुंबई महापालिका मुख्यालयात आजपासून हेरिटेज वॉक सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीचे अंतरंग सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. मुंबई पाश्चात्त्य देशापेक्षा कुठेही कमी नाही, हे या उपक्रमातून दाखवून दिले आहे अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मंत्र्यांकडून आढावा -
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय "इमारत दर्शन" (हेरिटेज वॉक) उपक्रम आज पासून बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात सुरू करण्यात आला आहे. या "हेरिटेज वॉक" मध्ये प्रथम संधी प्राप्त झालेल्या अर्चना नेवरेकर व सिताराम शेट्टी या पर्यटकांचा सोन्याचा मुलामा दिलेले पालिकेचे बोधचिन्ह तसेच पुष्पगुच्छ व ऐतिहासिक माहिती असलेली दिनदर्शिका मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी भेट देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच उर्वरित १३ पर्यटकांना सुद्धा पुष्पगुच्छ व ऐतिहासिक माहिती असलेली दिनदर्शिका महापौरांनी भेट देऊन सहभागी सर्व पर्यटकांचे स्वागत केले.
तत्पूर्वी या महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज प्रसारमाध्यम प्रतिनिधींसोबत हेरिटेज वॉक उपक्रमाच्या तयारी कामाचा आढावा घेतला.
दुर्मिळ गोष्टी बघण्याचा योग - यावेळी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय "इमारत दर्शन" (हेरिटेज वॉक) हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. अत्यंत कमी बजेट मध्ये बृहन्मुंबई महापालिकेची ही इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीमधील प्रत्येक प्रतिकांमध्ये काहीतरी वेगळे वैशिष्ट्य असल्याचे महापौरांनी सांगितले.
महानगरपालिका मुख्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना गाईडच्या मार्गदर्शनाखाली "इमारत दर्शन" (हेरिटेज वॉक) करण्याची संधी आतापर्यंत कधी मिळाली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता ही संधी प्रथमच उपलब्ध करून दिली असून गेट क्रमांक दोन पासून ते गेट क्रमांक सात पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारतीचे अंतरंग सौंदर्य पर्यटकांना न्याहाळता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
गाईड इमारतीमधील प्रत्येक भागाची विस्तृत माहिती देणार-
पर्यटकांसोबत असलेला गाईड हा इमारतीमधील प्रत्येक भागाची विस्तृत माहिती पर्यटकांना देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. एक तासापर्यंत हा इमारत दर्शन (हेरिटेज वॉक) चा कालावधी राहणार असून पर्यटकांना महापालिका मुख्यालयाच्या इमारतीचे प्रत्येक भागाचे सौंदर्य न्याहाळता येणार आहे. त्या काळातील महापालिकेचे वैभव लक्षात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. अश्या अनेक दुर्मिळ गोष्टी बघण्याचा योग देश विदेशातील पर्यटकांना "इमारत दर्शन" (हेरिटेज वॉक) करताना घेता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
या " इमारत दर्शन" (हेरिटेज वॉक ) साठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. इमारतीच्या डोममधील वरच्या भागात पांडव कालीन मंदिराप्रमाणे "की" आहे तर आतील बाजूस सोन्याचा मुलामा दिला असून पर्यटकांना याचे सौंदर्य सुद्धा न्याहाळता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. पाश्चात्त्य देशापेक्षा आपण कुठेही कमी नाही, हे आज या उपक्रमातून दाखवून दिले असल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा-संसदेत आक्रोश उठत नाही म्हणूनच जनसंसदेतून आंदोलन करतोय - मेधा पाटकर