महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

HC Relief to Aryan Khan : आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, जामिनाच्या अटींमध्ये दिली सूट

अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drug Case) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

aryan khan
आर्यन खान-मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Dec 15, 2021, 3:36 PM IST

Updated : Dec 15, 2021, 8:41 PM IST

मुंबई -अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drug Case) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. २८ ऑक्टोबरला आर्यन खानची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर दर शुक्रवारी आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली होती. आता त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनला सूट दिली आहे. दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्यन खानने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

  • न्यायालयाने काय म्हटले आहे?

दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या नियमातून आर्यन खानला सूट देण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली एसआयटी ज्यावेळी आर्यन खानला चौकशीसाठी बोलावेल त्यावेळी त्याला चौकशीसाठी हजर राहावे लागेल, अशी अट न्यायालयाने घालून दिली आहे. त्यासोबतच आर्यन खानला मुंबईतून बाहेर जायचे असेल, तर त्यासाठी तपास अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • काय आहे प्रकरण?

2 ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईतील क्रुझवर सुरू असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा होता. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार होती. आता न्यायालयाने ती अट शिथील केली आहे.

  • आर्यन खानच्या वकिलांचा युक्तिवाद -

वकील अमित देसाई यांनी आर्यन खानची बाजू मांडत असा युक्तिवाद केला की, या खटल्यात काहीही घडत नाही. आर्यन खान तपासात सहकार्य करायला तयार आहे. एनसीबीला हवं असेल तेव्हा तो एनसीबी कार्यालयात येऊ शकतो. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडे एसआयटीकडे आहे. त्यामुळे आर्यनला जर दिल्लीला जावे लागले तर विमानाने तो दिल्लीलाही जाईल. प्रत्येक शुक्रवारी त्याला मुंबई एनसीबी कार्यालयात हजर रहावे लागते. त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असतो. आर्यन खानपेक्षा पोलिसांची ही कुमक इतर अनेक चांगल्या कामांच्या दृष्टीने वापरता येईल.

  • एनसीबीचा युक्तिवाद-

एनसीबीचे वकील श्रीराम शिरसाट यांनी सांगितले की, एजन्सीला या बदलात कोणतीही अडचण नाही.परंतु आमची एकच विनंती आहे की जेव्हा त्याला बोलावले जाईल तेव्हा त्याने सहकार्य करावे आणि जेव्हा जेव्हा बोलावले जाईल तेव्हा त्याने मुंबई किंवा दिल्लीला यावे.

Last Updated : Dec 15, 2021, 8:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details