नवी मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी (८ सप्टेंबर) झालेल्या सुनावणीत गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. काळे यांच्यावर त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी शारीरिक, मानसिक छळ, जातिवाचक शिवीगाळ असे गंभीर आरोप केले आहेत. काळे हे कित्येक दिवसांपासून फरार होते.
नेरुळ पोलिस ठाण्यात काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून ते कित्येक दिवसांपासून फरार आहेत. उच्च न्यायालयाने सात सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. न्यायाधीश एस के शिंदे यांच्या पीठासमोर काळे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायाधीश शिंदे यांनी गजानन काळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
काळेंवर मारहाण, जातिवाचक शिवीगाळ, अनैतिक संबंधांचा आरोप
मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याविरुद्ध त्यांची पत्नी संजीवनी काळे यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात शारीरिक, मानसिक छळ, जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचे आरोप करत तक्रार दिली. संजीवनी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विविध कलमांखाली गजानन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गेली 13 वर्ष गजानन काळे हे त्यांच्या पत्नीला मारहाण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. त्याचबरोबर गजानन यांनी नवी मुंबई महापालिकेच्या वाहन विभागात भ्रष्टाचार केल्याचा देखील आरोप संजीवनी यांनी केला होता. वाहन विभागातील एका जागेच्या भरतीसाठी गजानन यांनी अडीच लाख रुपये घेतले होते. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी काळे यांना साथ दिली होती, असेही काळे यांच्या पत्नीने म्हटले आहे. याशिवाय पोलीस देखील काळे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला होता.