मुंबई-काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित 'कश्मीर फाइल्स'या चित्रपटाच्या ( Kashmir Files Movie ) प्रदर्शनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली ( PIL Against Kashmir Files ) होती. सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती विवय जोशी यांच्या खंडपीठासमोर ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी सादर करण्यात आली होती. त्यावर आज मंगळवारी रोजी तातडीनं सुनावणी घेण्यात आली असून, मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) ही याचिका फेटाळून लावली आहे.
काश्मिरी पंडितांच्या हत्येवर चित्रपट
कश्मीर फाइल्स हा चित्रपट साल 1989 आणि 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर थेट भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र, त्यावर आक्षेप घेत उत्तर प्रदेशचे रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांच्या केलेल्या हत्येवर आधारित असल्याचं भासत आहे. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचं याचिकेत म्हटलेलं होत.