मुंबई - एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवारी) राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिला आहे.
भीमा कोरेगाव येथे ३१ डिसेंबर २०१७ आणि १ जानेवारी २०१८ दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आनंद तेलतुंबडेंना मागील वर्षी अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांनी जामीनासाठी अर्ज सादर केला होता त्यावर आज झालेल्या सुनावणीत दोन आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे.
येथील विशेष न्यायालयाने मागील वर्षी जुलै महिन्यात आनंद तेलतुंबडेचा जामीन अर्ज फेटाळला होता. मागील दीड वर्षांपासून तुरुंगात असलेल्या तेलतुंबडेंनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधिज्ञ मिहीर देसाई यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत त्यांनी सर्वच आरोप फेटाळले आहेत.