मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला प्रसारमाध्यमांनी खरोखरच अतिरिक्त प्रमाणात बातम्या प्रसारित केल्या गेल्या होत्या का, याविषयी स्पष्टीकरण करण्यास गुरुवारी सांगितले. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांनी राज्य सरकारला 6 नोव्हेंबरपर्यंत याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूविषयीच्या बातम्यांचे अनावश्यक आणि मोठ्या प्रमाणात कव्हरेज देण्यात आले, असे या जनहित याचिकेत म्हटले आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारला ही विचारणा केली.
'जर खरोखरच जास्त प्रमाणात बातम्या प्रसारित होत असतील आणि त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होत असेल तर किंवा एखादा आरोपी सुटून जात असेल किंवा निरपराध व्यक्तीला बदनाम केले जात असेल,' अशा बाबींविषयी न्यायालयाने उल्लेख केला. तसेच, अशा प्रकारे बातम्या प्रसारित करण्यामुळे न्यायाला अडथळा येऊ शकतो का, असा प्रश्नही मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला विचारला आहे.
'आपल्याला प्रसारमाध्यमांनी त्यांच्या मर्यादा ओलांडलेल्या आवडणार नाहीत. तसेच, आपणही आपल्या मर्यादांमध्ये राहिले पाहिजे,' असे न्यायालयाने म्हटले आहे.
अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूविषयी बातम्यांचे कव्हरेज देताना किंवा माहितीचे प्रसारण करताना माध्यमांनी मर्यादा ओलांडली असेल तर, अशा प्रकारे कव्हरेज देणाऱ्या माध्यमांवर विधिमंडळाने कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
माध्यमांनी दिलेल्या कव्हरेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही याचिका काही माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी दाखल केली आहे. यात त्यांनी राजपूत प्रकरणात 'मीडिया ट्रायल' चालू आहे आणि हे थांबवायला हवे, असे म्हटले आहे.