मुंबई -राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यातील अपघातांची संख्या कमी होत नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यात राज्यात अपघातांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. तर या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत झाले आहेत. यामुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...
हेही वाचा -महाबळेश्वरने अनुभवला सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस
राज्यात २ हजार ७६४ अपघात वाढले -
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत अपघातांच्या संख्येत २५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते जून २०२० या काळात राज्यात एकूण ११ हजार ४८१ अपघात झाले होते. त्यात जानेवारी ते जून २०२१ या काळात १४ हजार २४५ पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा २ हजार ७६४ अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच या अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही यावर्षी वाढली आहे. राज्यात गेल्यावर्षी एकूण ५ हजार २०९ अपघाती मृत्यू झाले होते. त्यात यंदा ६ हजार ७०८ इतकी वाढ झाली आहे. यंदा अपघातांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांचा आकडा १० हजारांपार गेला आहे. गेल्यावर्षी ९ हजार ६४१ प्रवासी अपघातांमध्ये जखमी झाले होते. यंदा त्यांची संख्या १० हजार ८७९ इतकी झाली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून मिळाली आहे.