मुंबई -कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी दुसरीकडे विकास कामांना मुंबईत वेग आला आहे. मुंबई उपनगरात एमएमआरडीएमार्फत विविध कामे सुरू आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या कामाच्या प्रगतीचा ऑनलाईन प्रणालीद्वारे आढावा घेतला. एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव आणि अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, काळजी घेऊन विकास कामे मार्गी लावावीत, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या.
'वाहतूक कोंडी कमी करा'
पश्चिम आणि पूर्व द्रूतगती मार्गांवर टप्प्याटप्प्याने सौंदर्यीकरण, वाहतूक व्यवस्थापन, पादचारी आणि सायकलींसाठी मार्ग तयार करणे, फ्लायओव्हरच्या खाली अर्बन स्पेसेस तयार करणे अशी कामे केली जात आहेत. याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पश्चिम द्रूतगती मार्गावर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी अंडरपासचे काम लवकरच सुरू होईल. कलानगर फ्लायओव्हर येथील उत्तरेकडील मार्गिकेचे काम लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत होईल, असे पालकमंत्री ठाकरे यांनी सांगितले.