मुंबई - राज्यामधील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात येत असल्याने राज्य सरकारने ग्रामीण भागातील ५ वी पासून तर शहर विभागातील ८ वी पासूनचा शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमधील शाळा सुरू करण्यासाठी पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली असून त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे शिक्षण विभागाने जारी केली आहेत. त्याबाबतचे परिपत्रक पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी काढले आहे. यामुळे तब्बल दीड वर्षानंतर मुंबईमधील शाळा सुरू होणार आहेत.
दीड वर्षानंतर शाळा सुरु होणार -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्याने देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. या दरम्यान मुंबईत कोरोना विषाणूच्या दोन लाटा येऊन गेल्या. सध्या रुग्ण संख्या आटोक्यात असल्याने राज्य सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. या दरम्यान मुंबईमधील सर्व शाळा बंद होत्या. मुंबईसह राज्यातील कोरोना विषाणूची रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने राज्य सरकराने ४ ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील ५ वी पासूनच्या तर शहरातीलन ८ वी पासूनच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. त्याप्रमाणे मुंबईमधील ८ ते १२ चे वर्ग सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आहे.
५ लाख विद्यार्थी -
मुंबईत पालिकेच्या ८ वी ते १० वी च्या २४३ शाळा असून त्यात ४४ हजार ५२८ विद्यार्थी आहेत. ८ वी चा वर्ग असलेल्या ५३८ शाळांमध्ये २२ हजार ८३३ विद्यार्थी आहेत. अशा एकूण पालिकेच्या ७८१ शाळा आहेत. त्यात ६७ हजार ३६१ विद्यार्थी आहेत. तसेच खाजगी शाळा, शासनाच्या शाळा, इतर बोर्डाच्या १ हजर ७७२ शाळा असून त्यात ४ लाख ४६ हजार १४१ विद्यार्थी आहेत. पालिकेच्या व खासगी अशा एकूण २ हजार ५५३ शाळा असून ५ लाख १३ हजार ५०२ विद्यार्थी आहेत. ४ ऑक्टोबरपासून हे विद्यार्थी शाळेत जाणार आहेत.
पालिकेची मार्गदर्शक तत्वे -
१. शाळेतील वर्ग सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे.
२. शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व सुरक्षा विषयक उपाययोजना कराव्यात.
३. शाळा सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करावे.
४. शालनामधील कोव्हिड सेंटर, लसीकरण केंद्र इतर ठिकाणी हलवावे.