मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने १९ मार्चपासून मुंबईत डबे पोहोचवण्याचा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर पुढे लाॅकडाऊन लागू झाले आणि ते अजून सुरूच आहे. गेले साडेपाच महिने डबेवाल्यांना रोजगार नाही. लॉकडाऊनमध्ये त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकलसेवा सुरू करा, अन्यथा डबेवाल्यांना महिना किमान ३ हजार रूपये अनुदान द्या, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.
मुंबई हळूहळू पूर्व पदावर येताना दिसत आहे. काही शासकीय, निमशासकीय, तसेच खासगी कार्यालये चालू होत आहेत. या कार्यालयांमध्ये कमी प्रमाणात का होईना चाकरमानी कामावर रूजू होऊ लागले आहेत. हे चाकरमानी डबेवाल्यांना फोन करून डबे पोहोचवण्यास सांगत आहेत. मात्र, लोकलसेवा पूर्णपणे सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाला कामावर रूजू होऊ शकत नाही. त्यामुळे लोकल सेवा सुरू करण्याची मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने केली आहे. डबे पोहोचवण्याची सेवा अत्यावश्यक मानून त्यांना लोकलने प्रवास करू द्यावा, अशी मागणी सुभाष तळेकर यांनी केली आहे.