मुंबई - सरकारने डबेवाल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानंगी दिली. मात्र, लोकल प्रवासासाठी 'क्यूआर कोड' बंधनकारक असल्याने डबेवाल्यांचा प्रवासाचा प्रश्न अडकला आहे. क्यूआर कोड अभावी आज डबेवाल्यांना सेवा सुरू करता आली नाही, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
सुभाष तळेकर - अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोसिएशन हेही वाचा -मुंबई : शिक्षण समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशींची निवड; भाजपची दोन मते फुटली
क्यू आर कोडची चौकशी करण्यासाठी मुंबई डबेवाला असोसिएशनचे पदाधिकारी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांना तेथे रेल्वे अधिकाऱ्यांचा नंबर देण्यात आला. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर, त्यांनी डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्याबाबतचा कोणताही अध्यादेश आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे तुम्हाला क्यू आर कोड देता येणार नाही. जेव्हा नवीन अध्यादेश येईल तेव्हा डबेवाल्यांनी क्यू आर कोडसाठी अर्ज करा, असे सांगण्यात आल्याचे तळेकर म्हणाले.
रेल्वेने क्यू आर कोडसाठी आवश्यक ती प्रक्रियेची माहिती पेनड्राईवमध्ये भरून कार्यालयात सादर करायला सांगितली. मात्र, त्यासाठीही अँड्रॉईड फोन आवश्यक असून त्या मोबाईलवर क्यू आर कोड पाठवण्यात येईल. त्यानंतर लोकलने प्रवास करताना तो क्यू आर कोडचा वापर करायचा, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र, बहुतांश डबेवाल्यांकडे साधे मोबाईल असून मोजक्याच डबेवाल्यांकडे अँड्रॉईड मोबाईल उपलब्ध आहेत. त्यामुळे डबेवाल्यांना क्यू आर कोड मिळवणे अवघड जाणार आहे. आमची सरकारला विनंती आहे की, डबेवाल्यांकडे स्व:ताचे ओळखपत्र आहे, ते ओळखपत्र प्रमाण मानून त्यांना लोकलने प्रवास करू देण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी सुभाष तळेकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.