मुंबई - डबेवाला संघटनेनेही शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे.
'शेतकरी कायदे देशाच्या पोशिंद्याला मारक'
केंद्र सरकारने केलेले कायदे हे देशाच्या पोशिंद्याला मारक आहेत. त्यामुळे या बंदला आम्हीदेखील पाठिंबा देत आहोत, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे. विविध पक्षांच्या पाठिंब्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. मागील 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. दरम्यान, या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिले आहे. त्यातच मुंबईची शान असणाऱ्या, जगात डंका असणाऱ्या मुंबई डबेवाल्यांनीही पाठिंबा सकाळी जाहीर केला.