मुंबई -टाळेबंदी लागू झाल्यापासून मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद आहे. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची भेट घेतली.
डबेवाल्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; मनसे करणार सरकारकडे 'या' मागण्या - Subhash Talekar on Dabbewala issues in lockdown
वेळेच्या व्यवस्थापनासाठी नावाजलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांचे सर्व कामकाज कोरोनामुळे बिघडले आहे. अशा परिस्थितीत डबेवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा, अशी डबेवाले संघटनेने भूमिका मांडली आहे.
मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले, की मनसेने सविनय कायदेभंगाने आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला डबेवाल्यांचा पाठिंबा होता. त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही आलो होतो. आमचे प्रश्नही राज ठाकरे यांच्याकडे मांडले आहेत.
टाळेबंदीनंतर डबेवाल्यांचे हाल झाले. त्याबाबत शिष्टमंडळाने राज ठाकरेंना माहिती दिली. लोकलने डबेवाल्यांना प्रवास करण्याची परवानगी द्या. ज्याप्रकारे असंघटित कामगारांना सरकारने मदत दिली. त्याच धर्तीवर डबेवाल्यांना आर्थिक मदत म्हणून 5 हजार रुपये देण्यात यावेत, अशी सरकारकडे मागणी असल्याचे शिष्टमंडळाने राज ठाकरे यांना सांगितले. त्यावर राज यांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडेन, असे आश्वासन दिल्याचे सुभाष तळकेर यांनी सांगितले. डबेवाल्यांचे सर्व प्रश्न आणि मागण्या मनसेतर्फे सरकारकडे मांडण्यात येतील, अशी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.