मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. गेल्या सुनावणीत कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे गेल्या 18 दिवसांपासून अटकेत असणाऱ्या आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आर्यन खान बरोबरच अन्य दोघांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
क्रुझ ड्रग्ज पाट्री व आर्य़न खान प्रकरणाचा घटनाक्रम -
कोण आहे आर्यन खान -
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतर सात जणांना एनसीबीने अटक केली. आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट, मून मून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
पार्टीची माहिती नव्हती -
प्रतिक गाबा नावाच्या मित्राने फोनवरुन पार्टीची माहिती दिली. अतिमहत्वाच्या व्यक्तींना निमंत्रण दिल्याचे सांगितले होते. प्रतीक गाबा हा त्यानंतर फर्निचरवालासोबत संपर्कात होता. फर्निचरवाला आयोजकांच्या कायम संपर्कात होता. पार्टीत ग्लॅमर तडाका टाकावा, या निमित्ताने कदाचित मला पार्टीचं निमंत्रण दिले असावे. परंतु, त्याच्या कोणत्याही हालचालींची मला कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण आर्यन खान यांच्या वकिलांनी न्यायालयात दिले होते.
कधी झाली अटक?
२ ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले. पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड त्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती. सुरुवातीला आर्यन सह दोघांना तर उर्वरित पाच आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक केली होती. रिमांड कालावधी संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आले. जामीन अर्जावर वादी - प्रति वाद्यांकडून जोरदार युक्तिवाद चालला. कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
हे ही वाचा -'राहुल गांधींना ड्रग्जचं व्यसन, ते तस्करी देखील करतात'; कर्नाटकातील भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
जामीन का नाकारला -
कार्डेलिया क्रूझवर टाकलेल्या छापेमारीत ड्रग्स आढळून आले. ड्रग्स प्रकरण थेट परदेशातील ड्रग्स टोळींशी निघडीत असू शकते. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तसेच या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सामील आहे. अटकेत असलेली मुले महाविद्यालयीन असल्याने तरुणांवर याचा वाईट परिणाम होईल. देशाचे भविष्य या पिढीवर अवलंबून असल्याचे सांगत, जामीन नाकारण्यात आला आहे. शाहरुख खान याने आर्यन खानचे बाजू मांडणारे वकील सतीश माने - शिंदे यांना बदलण्यात आले. आता अमित देसाई आर्यन खानची बाजू न्यायालयात मांडणार आहेत.
'आर्यन खान कैदी नंबर-956' -
ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या कैदी नंबर N956 आर्यन खानला आर्थर रोड येथील तुरूंगात ठेवले आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मुदत असून त्यावर सुनावणी होणार आहे. अरबाज मर्जेंटसह इतर आरोपींना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बरॅक नंबर एकमध्ये सुरुवातीला ठेवले होते. बरॅक नंबर एक हा कोरोना काळात आयसोलेशन वॉर्ड म्हणून तयार केला होता. सर्व आरोपींची कोरोना चाचणी यावेळी निगेटिव्ह आली होती.
बॉलीवूड कलाकारांचा पाठिंबा -
आर्यन खानला अटक केल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खान याला बॉलिवूडमधील काही कलाकारांनी पाठींबा दिला. प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट, अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ति, सलमान खान, सुनील शेट्टी प्रत्यक्ष भेट घेत पाठिंबा दिला. सोशल मीडियातून त्यांनी अटकेविरोधात भावना व्यक्त केल्या.
नवाब मलिक यांचे एनसीबी व समीर वानखेडेंवर आरोप -
मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली क्रुझवर कारवाई झाली. सर्व आरोपींना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पडकल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. एनसीबीची कारवाई बेकायदीश असल्याचा मलिक यांनी दावा करताना, फोटो आणि व्हिडिओ प्रसार माध्यमांसमोर जाहीर केले. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक करून ओढत नेणाऱ्या लोकांमध्ये जे. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली या भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचे मलिक म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार अशा नेत्यांसोबत फोटोही प्रसार माध्यमांमध्ये जाहीर केले होते. तसेच हे लोक एनसीबीच्या छापेमारीत कसे?, एनसीबीशी त्यांचा संबंध काय, असे सवाल उपस्थित केला होता.
हे ही वाचा -आर्यन खानचे व्हॉट्सअॅप चॅट न्यायालयात सादर, ड्रग्जशी संबंध असल्याचा NCB चा दावा
आर्यनचे अभिनेत्रीसोबत चॅट कोर्टात सादर -
एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती कोर्टात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे. एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासलं असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केलं होतं असं समोर आले आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतल्या ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती.
एनसीबीचा खुलासा -
एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा करताना, एनसीबीची कारवाई कायदेशीर होती. त्यानुसारच स्वतंत्र साक्षीदारांना बरोबर नेण्यात आल्याचा दावा केला. भाजपनेही कारवाईची प्रसंशा करत राष्ट्रवादीवर टीका केली होती.