मुंबई - लग्नानंतर त्रास देणाऱ्या प्रियकराचा उंदीर मारण्याचे द्रव्य अन्नात मिसळून काटा काढल्याची घटना वडाळा परिसरात घडली. या प्रकरणी आरोपी महिलेला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वडाळा परिसरातील, राजीव गांधी नगर या ठिकाणी असलेल्या मैदानात पोलिसांना प्रियकर विजय नाकटे या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही जखमा नसल्याने, या संदर्भात प्राथमिक चौकशीत पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती.
लग्नानंतर त्रास देणाऱ्या प्रियकराचा उंदीर मारण्याचे विष देऊन काढला काटा मृत विजय नाकटे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता, विजयचा मृत्यू हा विष पोटाच गेल्याने झाला असल्याचे समोर आले. या संदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता, मृत विजय याचे त्याच्या परिसरात राहणाऱ्या काजल या महिलेसोबत प्रेम संबध असल्याचे पोलिसांना कळले. काही वर्षांपूर्वी काजलच्या वडिलांनी काजल हिचे परस्पर साताऱ्यातील कराड या ठिकाणी लग्न लावून दिले होते. मात्र, लग्नानंतरही विजय नाकटे हा काजलच्या संपर्कात होता.
असा काढला काटा..
विजय प्रत्येकवेळी दारू पिऊन "तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्या जवळ ये" असे काजलला सांगत असे. या दरम्यान काजल 15 जुलैला मुंबईतील वडाळा परिसरातील तिच्या माहेरी आल्यावर, विजयने दारूच्या नशेत तिच्या घरी जाऊन तिला नवऱ्याला सोडून आपल्याकडे येण्यास सांगितले. या त्रासाला कंटाळलेल्या काजलने विजयला रात्री जेवायला घरी बोलावून, आमटीत उंदीर मारण्याचे विष मिसळले. जेवणानंतर काजलने विजयला दारू पिण्यास दिली. काही वेळातच विजय बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच, तिने त्याला राजीव गांधी नगर मधील मैदानात आणून ठेवले.
मृतदेहाशेजारी ठेवलेल्या चपलेवरून पोलिसांना आला संशय..
ज्या ठिकाणी विजयचा मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी विजयच्या पायातील चपला सरळ होत्या. एखादी व्यक्ती जर जमिनीवर तडफडत पडली असेल, तर तिच्या चपला पायात आढळणार नाहीत. याच गोष्टीवरून पोलिसांनी चपलेवरील हातांचे ठसे घेऊन तपास केला असता, धागेधोरे काजलपर्यंत पोहचले, त्यानंतर पोलिसांनी काजलला अटक केली.