महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'राईस पुलर'च्या नावाखाली लाखोंना चुना लावणाऱ्या टोळीला मुंबईत अटक - mumbai news

अटक आरोपींकडून पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक साहित्य, टिनस इंटरनॅशनल या कंपनीची कागदपत्रे, रेडिएशन सूट, विशिष्ट प्रक्रिया केलेल्या तांदूळसह इतर साहित्य हस्तगत केले आहे.

'राईस पुलर'च्या नावाखाली लाखोंना चुना लावणाऱ्या टोळीला मुंबईत अटक
'राईस पुलर'च्या नावाखाली लाखोंना चुना लावणाऱ्या टोळीला मुंबईत अटक

By

Published : Feb 24, 2020, 7:22 PM IST

मुंबई - राईस पुलरच्या नावाखाली पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना चुना लावणाऱ्या 7 जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या 'गुन्हे शाखा 11' ने अटक केली आहे. मुंबईतील मालाड परिसरात एका बंगल्यात काहीजण कॉपर इरेडियम या दुर्मिळ धातूचा वापर करून 'राईस पुलर'चे सर्वेक्षण करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 11 ला मिळाली होती. 22 फेब्रुवारीला पोलिसांनी मालाड पश्चिम येथे किनारा बंगला या ठिकाणी धाड मारून 7 आरोपीना मुद्देमालासह अटक केली आहे.

दरम्यान, अटक आरोपींकडून पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक साहित्य, टिनस इंटरनॅशनल या कंपनीची कागदपत्रे, रेडिएशन सूट, विशिष्ट प्रक्रिया केलेल्या तांदूळसह इतर साहित्य हस्तगत केले आहे. या प्रकरणी सोबितकुमार भुवनेश्वर दास (48), मनीष नरेश मित्तल (38), संजय रामसेवक चौधरी (54), उत्तम कचरे माधावी (36), निजार अहमद अब्दुल रहमान (43), सुधीर श्रीकृष्ण ठाकूर (32), निलेश सदानंद दळवी (49) या आरोपींना अटक केली आहे.

काय आहे राईस पुलर

अटक करण्यात आलेल्या 7 जणांच्या टोळीने राईस पुलर या पद्धतीचा वापर करून आपण संशोधन करत असल्याचे काही जणांना भासवले होते. कॉपर इरेडियम या धातूचा वापर अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सॅटेलाईट, लॉन्च व्हेईकलमध्ये करण्यात येतो व त्याची मोठी मागणी असल्याचे ही टोळी भासवत होती. यासाठी या टोळीने टिनस आंतरराष्ट्रीय अँटीक्यू अँड मेटल प्रायव्हेट लिमिटेड ही बनावट कंपनी स्थापन करून त्यांची वेबसाईटसुद्धा सुरू केली होती. कॉपर इरेडियमने तांदळाचा एक तुकडा 1 इंचावरून स्वतःकडे खेचल्यास त्याची किंमत प्रति नग 5 हजार कोटी मिळत असल्याचे आरोपी गुंतवणूकदारांना सांगत होते. कॉपर इरेडियममध्ये अल्फा, बिटा, गॅमा सारखी किरणे उत्सर्जित व आकर्षित करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असल्याने त्याचे परीक्षण तांदळात असलेल्या गुणांमुळे केले जाऊ शकते. मात्र, आतापर्यंत टप्याटप्यात करण्यात आलेल्या संशोधनाला भारताच्या डीआरडीओ व संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली असल्याचे ही टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे दाखवत आली होती. संशोधन पूर्ण झाल्यावर टिनस कंपनीसारख्या कंपनी हे कॉपर इरेडियम विकत घेतील व त्यातून संशोधनात पैसा गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना शेकडो कोटी रुपये मिळतील असे आमिष ही टोळी दाखवत होती.

हेही वाचा -ट्रम्प यांचा भारत दौरा केवळ व्यापारच नव्हे तर रणनीतीसाठीही महत्त्वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details