महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट दुर्घटनेची चौकशी करा - महापौर - बजाज फाउंडेशन

28 एप्रिलला या वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट कोसळली. यात दक्षिण मुंबईतील दंतचिकित्सक डॉ. अर्नवाझ हवेवाला व त्यांची कन्या या दोघी जखमी झाल्या. त्यानंतर हवेवाला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय

By

Published : May 11, 2019, 8:07 AM IST

मुंबई- भायखळा राणीबाग येथील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. या दुर्घटनेची चौकशी करून दोषी विश्वस्त आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर


भायखळ्यातील राणीबाग येथे भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आहे. या वस्तुसंग्रहालयाची देखभाल बजाज फाउंडेशन या विश्वस्त संस्थेकडून केली जाते. ही संस्था पालिकेला विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 28 एप्रिलला या वस्तुसंग्रहालयातील लिफ्ट कोसळली. यात दक्षिण मुंबईतील दंतचिकित्सक डॉ. अर्नवाझ हवेवाला व त्यांची कन्या या दोघी जखमी झाल्या. या दुर्घटनेनंतर डॉ. हवेवाला यांना मसिना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.


डॉ. हवेवाला यांच्या मृत्यूला वस्तुसंग्रहालयाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप डॉ. हवेवाला यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केला आहे. मात्र, वस्तुसंग्रहालयाच्या लिफ्टची देखभाल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीच्या चुकीमुळे हा अपघात झाला असून ती कंपनी या दुर्घटनेला जबाबदार असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.


वस्तुसंग्रहालाच्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी मुंबईचे महापौर आहेत. या दुर्घटनेची माहिती त्यांच्यापासूनही लपवण्यात आली. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख व विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली. शेख आणि रवी राजा यांनी पत्राद्वारे चौकशीची मागणी केल्यावर महापौरांनी या प्रकरणाची माहिती घेतली. वस्तुसंग्रहालयाचे कामकाज पाहणाऱ्या बजाज फाउंडेशनने आपण अध्यक्ष असतानाही आपल्याला या प्रकरणी अंधारात ठेवल्याने महापौरांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी वस्तुसंग्रहालयाचे विश्वस्त आणि अधिकारी दोषी असल्याने त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details