महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Corporation : महापालिकेने 3 महिन्यांत 7211 हजार खड्ड्यांवर केली मलमपट्टी - मुंबई पालिकेने खड्डे बुजबले

पावसाळ्यामुळे मुंबईत ( Mumbai Rain ) दरवर्षी रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निर्माण होते. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होतात काहींचा मृत्यूही होतो. मात्र, यंदा पालिकेने तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल ७,२११ खड्डे बुजवले ( Mumbai Corporation Filled 7211 Pits ) आहेत.

Mumbai Corporation mumbai pits
Mumbai Corporation mumbai pits

By

Published : Jul 10, 2022, 3:42 PM IST

मुंबई -मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात ( Mumbai Rain ) रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निर्माण होते. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होतात काहींचा मृत्यूही होतो. यासाठी पालिका दरवर्षी खड्डे बुजवते. यंदा पालिकेने १ एप्रिल ते ७ जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल ७,२११ खड्डे बुजवले आहेत. मागील वर्षी पालिकेने १० हजार १९९ खड्डे बुजवले होते. मागील वर्षापेक्षा यंदा २९८८ खड्ड्यांच्या संख्येत घट झाली असल्याचा, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला ( Mumbai Corporation Filled 7211 Pits ) आहे.

७ हजार २११ खड्डे बुजवले -मुंबई महानगरात सुमारे २ हजार ०५५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. पैकी १,२५५ किलोमीटर डांबरी तर ८०० किलोमीटरचे काँक्रिट रस्ते आहेत. डांबराच्या रस्त्या (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडतात. रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने दरवर्षी विविध उपाययोजना करण्यात येतात. यंदा १ एप्रिल २०२२ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील रस्त्यांवर सुमारे ७ हजार २११ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२ हजार ६९५ चौरस मीटर इतके आहे. गतवर्षी याच कालावधीत महानगरपालिकेने सुमारे १० हजार १९९ खड्डे बुजवले होते, यंदा खड्ड्यांच्या संख्येत घट झाली आहे. खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, समाजमाध्यम, टोल फ्री दूरध्वनी क्रमांक, असे विविध पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. मुंबईतील इतर शासकीय प्राधिकरणांनी देखील आपापल्या अखत्यारीतील रस्त्यांचे योग्य परीरक्षण करावे, खड्डे तातडीने बुजवावेत म्हणून देखील महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.



खड्डे मुक्त मुंबईसाठी सिमेंट काँक्रिटीकरण -रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी/ खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी, मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे. मागील ५ वर्षात ६०८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मुंबईतील सुमारे ८०० किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे झाले आहेत. अशा रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली निघाल्या आहेत. यापुढे ६ मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्ड्यांची समस्या निश्चितच कमी होणार आहे, अशी माहिती पी. वेलरासू यांनी दिली आहे.




खड्डे शोधून भरण्यासाठी पथक -बृहन्मुंबई महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे शोधून ते भरण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार केली आहेत. या पथकाद्वारे खड्डे शोधून ते भरण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येते. खड्डे विषयक तक्रार प्राप्त झाल्यानंतर तो भरण्यासाठी ४८ तासांची मुदत असली तरी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाद्वारे २४ तासांच्या आतमध्ये खड्डे भरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या, छायाचित्रांद्वारे त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) प्रसिद्ध झालेले खड्डे यांची दखल घेत तातडीने भरण्यात येतात, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), रेल्वे, खासगी लेआउट याप्रमाणेच इतरही शासकीय प्राधिकरणांच्या अखत्यारित काही रस्ते आहेत. त्या रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांची असते. त्यामुळे प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी संबंधित प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.




खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर -रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे काम महानगरपालिका करत असते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो. आतापर्यंत २४ प्रशासकीय विभागांना मिळून सुमारे २ हजार ४२२ मेट्रिक टन ड्राय कोल्ड मिक्स पुरवण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे २ कोटी रुपयांचा निधी यंदा देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत. प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत (DLP) असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादीत वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही मोबदला दिला जात नाहीत.




खड्ड्यांवर इतका खर्च -रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी २०२१ - २२ या आर्थिक वर्षात ४१.३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यापैकी ३८.४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मागील वर्षी खड्ड्यांबाबत ४० हजार तक्रारी नोंद झाल्या होत्या. २०२२ - २३ मध्ये खड्डे बुजवण्यासाठी ५२ कोटी रुपयांची तरतूद काढण्यात आली आहे. पालिकेचे २४ वॉर्ड आहेत. प्रत्येकी वॉर्डला खड्डे भरण्यासाठी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यात ५० लाख खड्डयांच्या दुरुस्तीसाठी तर १.५० कोटी परिरक्षणासाठी देण्यात आले आहेत.




येथे करा खड्ड्यांविषयक तक्रारी -

  • ऑनलाइन पोर्टल/अ‍ॅप: MyBMCpotholefixit ॲप
  • आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपर्क क्रमांक: 1916
  • टोल फ्री दूरध्वनी क्रमांक: १८००२२१२९३
  • ट्विटर: @mybmcroads
  • बीएमसी व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक: 91-8999228999

हेही वाचा -शिवसेनेच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांच्या नोटिसा; आदित्य ठाकरेंना नोटीस नाही...

ABOUT THE AUTHOR

...view details